लंडन : काही दशकांपासून शास्त्रज्ञांचा असा मानण्याकडे कल होता की, झाडांची उंची जितकी जास्त तितके त्यांना मुळांपासून पानांपर्यंत पाणी पोहोचवणे कठीण जाते. परंतु, ‘सायन्स’ या प्रतिष्ठित नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासाने हा जुना सिद्धांत चुकीचा ठरवला आहे. ब्रिटनमधील एक्झेटर आणि कार्डिफ विद्यापीठाच्या संशोधकांनी मलेशियातील बोर्नियोच्या जंगलातील २३ ते २३३ फूट (७ ते ७१ मीटर) उंच असणाऱ्या ‘डिप्टेरोकार्प’ झाडांचा अभ्यास करून हा शोध लावला आहे.
अतिउंच झाडे पाणी कसे वाहून नेतात?
अत्यंत उंच झाडांमध्ये पाणी वाहून नेणारी अंतर्गत यंत्रणा अतिशय प्रगत असते. झाडांच्या खोडामधील पाण्याच्या वाहिन्या जमिनीजवळ अधिक रुंद असतात. त्यामुळे पाण्यावरील गुरुत्वाकर्षणाचा आणि प्रवाहाचा ताण कमी होतो. झाडांची वरची पाने पाण्याच्या टंचाईचा सामना अधिक सक्षमपणे करू शकतात, ज्यामुळे ती सहजासहजी सुकत नाहीत.
दुष्काळातही झाडांची वाढ स्थिर
२०२३-२०२४ मधील भीषण ‘अल निनो’ दुष्काळादरम्यान संशोधकांनी या झाडांच्या वाढीवर बारीक लक्ष ठेवले. त्यांना आढळले की, दुष्काळामुळे छोट्या झाडांच्या तुलनेत मोठ्या झाडांच्या वाढीवर कोणताही अतिरिक्त विपरीत परिणाम झाला नाही. जंगलातील सर्वात जास्त उंच असलेली १ टक्के झाडे ही एकूण कार्बन साठ्यापैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त कार्बन शोषून घेतात. हवामान बदलाच्या मॉडेल्समध्ये आतापर्यंत उंच झाडे दुष्काळात लवकर नष्ट होतील, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, या नव्या शोधामुळे हवामान बदलाचे अंदाज बदलण्यास मदत होणार आहे.