वॉशिंग्टन : जगभरात कॉफीचे शौकिन प्रचंड असतील. रोज सकाळी कॉफीचा आस्वाद घेतच दिवसाची सुरुवातही अनेकांची होते. रात्री उशिरापर्यंत जागणारे काही जणही कॉफी घेत असतात. कॉफी करण्याची कला फारशी कठीण देखील नाही, पण ती केवळ पृथ्वीतलासाठी! याचे कारण असे की एक जागा अशीही आहे, जिथे कॉफी पिणे देखील बरेच मेहनतीचे आहे आणि ती जागा म्हणजे अर्थातच अंतराळात!
युरोपियन स्पेस एजन्सीने ट्विटमध्ये व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात एक महिला अंतराळवीर अंतराळात कॉफी पिताना दिसून येते. क्रिस्टोफॉरेस्टी असे या अंतराळवीर महिलेचे नाव आहे. गुरुत्वाकर्षण नसल्याने तिचे केस हवेत उंचावत होते. तिच्या हातात एक कॉफीचे पॅकेट असून या पॅकेटवर एक पाईप लावलेले आहे. त्या माध्यमातून ती एका काचेच्या बाटलीत कॉफी भरताना दिसून येते. नंतर ती ही बाटली सोडून देते. पण, ही बाटलीही हवेतच तरंगत राहते. ही बाटली वेगळ्या आकाराची असून यामुळे कॉफी त्यातून ओतण्यास मदत होते, असे व्हिडीओत दिसून येते.
यावर मार्ग काढण्यासाठी अंतराळवीर एक कप दाखवते, ज्याला स्पेस कप या नावाने ओळखले जाते. या कपचे वैशिष्ट्य म्हणजे कॉफी त्यातून कॅपिलरी अॅक्शनने बाहेर पडते.
युरोपियन एजन्सीने ट्विट केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत 3 लाखांहून अधिक नेटिझन्सनी पाहिला आहे. या कॉफीत लिक्विड शुगरही असेल, असे काही युझरनी म्हटले तर एकाने विचारले, अंतराळात कॉफीची चव व त्याचा सुगंध बदलतो का? एकाने असेही म्हटले की, थेट पाऊचमधूनच कॉफी का पिली नाही? यामुळे कपचाही प्रश्न बाकी राहणार नाही.