Bigfoot history | बिगफूटच्या दंतकथेची सुरुवात कशी झाली?  Pudhari File Photo
विश्वसंचार

Bigfoot history | बिगफूटच्या दंतकथेची सुरुवात कशी झाली?

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : 1958 सालापर्यंत बिगफूट हे नाव कोणालाही ठाऊक नव्हते. पण, कॅलिफोर्नियातील एका छोट्या बातमीने या रानटी मानवाच्या आधुनिक दंतकथेला जन्म दिला. सप्टेंबर 1958 मध्ये, हमबोल्ट टाइम्सचे पत्रकार अँड्र्यू गेंझोली यांच्याकडे एका वाचकाचे पत्र आले. उत्तर कॅलिफोर्नियातील लाकूडतोड्यांना जंगलात काही रहस्यमयी आणि अवाढव्य मानवी पाऊलखुणा आढळल्या होत्या. गेंझोली यांनी मजेने आपल्या स्तंभात लिहिले, “कदाचित आपल्याला हिमालयातील एबोमिनेबल स्नोमॅनचा (यती) एखादा नातेवाईक सापडला असावा.”

वाचकांनी या बातमीला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. त्यानंतर गेंझोली आणि त्यांच्या सहकारी बेटी अ‍ॅलन यांनी यावर मालिका सुरू केली. त्या भागातील कामगारांनी या रहस्यमयी प्राण्याला ‘बिग फूट’ असे नाव दिले होते. तेव्हापासून हे नाव जगभर प्रसिद्ध झाले. कॅनडातील स्थानिक जमातीमध्ये सॅस्क्वेटस् नावाच्या रानटी मानवाच्या कथा पूर्वापार चालत आल्या होत्या, ज्यातून सॅस्क्वॅच हा शब्द आला. तज्ज्ञांच्या मते, 1950 च्या दशकापूर्वी अशा अनेक कथा विखुरलेल्या होत्या; पण 1958 च्या बातम्यांनंतरच बिगफूट ही एक जागतिक ओळख बनली.

70 च्या दशकात बिगफूटला एक हिंस्र आणि धोकादायक प्राणी म्हणून दाखवले गेले. अनेक माहितीपट आणि चित्रपटांनी या कथेला अधिक गूढ बनवले. 80च्या दशकातील हॅरी अँड द हेंडर्सन्स (1987) सारख्या चित्रपटांमुळे बिगफूटची प्रतिमा बदलली. तो एक प्रेमळ आणि पर्यावरणाचे प्रतीक असलेला प्राणी म्हणून समोर आला. आज बिगफूट हा केवळ एक रहस्यमयी प्राणी उरलेला नाही, तर तो एक मीडिया आयकॉन बनला आहे. जरी विज्ञानाकडे याचे ठोस पुरावे नसले, तरी जंगलात एक अवाढव्य मानवाकृती प्राणी वावरतोय, या कल्पनेचे आकर्षण आजही कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT