North Korea Hacking Force | उत्तर कोरिया कसा बनला शक्तिशाली ‘हॅकिंग फोर्स’? 
विश्वसंचार

North Korea Hacking Force | उत्तर कोरिया कसा बनला शक्तिशाली ‘हॅकिंग फोर्स’?

पुढारी वृत्तसेवा

प्योंगयांग : जगातील सर्वात गरीब आणि अत्यंत गुप्त देशांपैकी एक असलेल्या उत्तर कोरियातील सामान्य नागरिकांना बाहेरील जगाशी कोणताही संपर्क ठेवण्याची परवानगी नाही. मोजक्या श्रीमंत वर्गाकडे फोन किंवा संगणक असले, तरी त्यांना केवळ सेन्सॉर केलेल्या 'इंट्रानेट'पुरतेच मर्यादित ठेवले जाते. परदेशी चित्रपट पाहणे हा तेथे गुन्हा आहे. असे असूनही, उत्तर कोरियाने जगातील सर्वात शक्तिशाली 'हॅकिंग फोर्स' कशी उभी केली?

गेल्या महिन्यात जगातील सर्वात मोठ्या 'बायनान्स' क्रिप्टो एक्स्चेंजमधून तब्बल ६ अब्ज डॉलर्सची (सुमारे ५० हजार कोटी रुपये) क्रिप्टोकरन्सी चोरून या सायबर सैन्याने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. या चोरीमुळे उत्तर कोरियाने आजवर लुटलेली एकूण रक्कम १३ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.

या सायबर सैन्याची पायाभरणी १९८० च्या दशकात तत्कालीन शासक किम इल सुंग यांनी केली. त्यांनी राजधानी प्योंगयांगमध्ये हुशार विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि परदेशी भाषा शिकवणाऱ्या विशेष शाळा सुरू केल्या. दरवर्षी संगणक शास्त्रातील अव्वल १०० विद्यार्थ्यांना लष्करी विद्यापीठांमध्ये पाठवले जाते. यातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना प्रगत प्रशिक्षण घेण्यासाठी चीन, रशिया आणि काही पाश्चात्य देशांमध्येही पाठवले गेले. मायदेशी परतल्यावर या तरुणांची भरती लष्कराच्या कुप्रसिद्ध 'युनिट १२१' मध्ये केली जाते. गरिबीत खितपत पडलेल्या या देशात हॅकर्सना राजधानीत आलिशान घरे आणि विशेष सवलती दिल्या जातात. आज किम जोंग उन यांच्या या सायबर सैन्यात १,८०० ते ७,००० प्रशिक्षित हॅकर्स कार्यरत आहेत.

हॉलीवूडपासून बँका, क्रिप्टो लुटीपर्यंतचा प्रवास

२०१४ मध्ये उत्तर कोरियाच्या 'लाझारस ग्रुप'ने हॉलीवूडच्या 'सोनी पिक्चर्स'वर सायबर हल्ला करून आपल्या ताकदीची चुणूक दाखवली. त्यानंतर २०१६ मध्ये बांगला देशच्या मध्यवर्ती बँकेतून ८१ दशलक्ष डॉलर्स लंपास केले. आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे आर्थिक कोंडी झाल्यावर उत्तर कोरियाने क्रिप्टोकरन्सीकडे मोर्चा वळवला. २०२५ मध्ये 'बायबिट' प्लॅटफॉर्मवरून १.५ अब्ज डॉलर्स चोरल्यानंतर, नुकतीच बायनान्सवर इतिहासातील सर्वात मोठी सायबर दरोडेखोरी केली.

चोरीची पद्धत आणि काळ्या पैशांचे रूपांतर

या हॅकर्सचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे 'सोशल इंजिनिअरिंग' अर्थात मानवी चुकांचा फायदा घेणे. बनावट नोकरीच्या मुलाखती, फिशिंग ईमेल आणि 'डीपफेक' व्हिडीओ कॉल्सच्या माध्यमातून ते कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना जाळ्यात ओढतात. बायनान्सच्या एका कर्मचाऱ्याला बनावट मुलाखतीत फसवून अवघ्या २० मिनिटांत ६ अब्ज डॉलर्स लुटले गेले. चोरलेली क्रिप्टोकरन्सी विविध ब्लॉकचेन आणि 'मिक्सर्स'मधून फिरवून तिचा मागोवा पुसला जातो. त्यानंतर ती चिनी दलालांना विकून त्याबदल्यात रोख रक्कम किंवा चिनी बँक खात्यात पैसे घेतले जातात. या प्रक्रियेत मूळ रकमेच्या ७५ ते ८५ टक्के हिस्सा उत्तर कोरियाच्या हाती लागतो.

अण्वस्त्र कार्यक्रमाला निधी

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, उत्तर कोरियाच्या एकूण परकीय चलनापैकी निम्मा वाटा या सायबर चोऱ्यांमधून येतो. या पैशांचा वापर आंतरराष्ट्रीय निर्बंधांना न जुमानता अण्वस्त्रे, क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि रशियाला शस्त्रास्त्र पुरवठा करण्यासाठी केला जातो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने हे हल्ले अधिकच घातक होत असून, जागतिक सायबर सुरक्षेसमोर हे सर्वात मोठे आव्हान बनले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT