AI and Human Destruction | ‘एआय’ला विचारले, ‘मानवाचा विनाश कसा करशील?’ आणि...  
विश्वसंचार

AI and Human Destruction | ‘एआय’ला विचारले, ‘मानवाचा विनाश कसा करशील?’ आणि...

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) अनियंत्रित होऊन मानवी अस्तित्‍व संपुष्टात आणू शकते का? या गंभीर विषयावर चर्चा सुरू असतानाच ‘बिजनेस इनसायडर’च्या टीमने जगातील चार सर्वात लोकप्रिय एआय टूल्स - चॅटजीपीटी, जेमिनी, क्लॉड आणि ग्रोक यांना एकच प्रश्न विचारला: ‘एआय मानवाच्या विनाशाचे कारण कसे बनू शकते?’ या चारही चॅटबॉट्सनी हॉलीवूड चित्रपटांमधील ‘टर्मिनेटर’सारख्या किलर रोबोंच्या संकल्पनेला पूर्णपणे फेटाळून लावले. एआय मानवांशी थेट दुष्मनासारखे वागणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केले; मात्र मानवाकडून एआयचा होणारा घातक गैरवापर आणि एआय मानवापेक्षा अधिक बुद्धिमान होऊन नियंत्रणाबाहेर जाणे यामुळे विनाश घडू शकतो, हे चौघांनीही मान्य केले.

गूगल जेमिनीचे उत्तर : गूगलच्या जेमिनीने तंत्रज्ञान तज्ज्ञांचा हवाला देत एआयद्वारे मानवाचा थेट संहार केला जाण्याची शक्यता फेटाळली. जेमिनीच्या मते, एआय अधिक बुद्धिमान होणे म्हणजे त्याच्या मनात मानवाबद्दल द्वेष किंवा वाईट भावना निर्माण होणे नव्हे. तसेच, लष्करी आणि अणुऊर्जा यंत्रणा इंटरनेटपासून पूर्णपणे वेगळ्या ठेवल्या जातात आणि त्या मानवाच्या थेट देखरेखीखाली असतात. त्यामुळे एआय थेट नियंत्रण मिळवणे अशक्य आहे.

क्लॉड आणि ग्रोक : अँथ्रॉपिकच्या क्लॉड आणि एलन मस्क यांच्या ग्रोकने एका अत्यंत भयानक पैलूकडे लक्ष वेधले. कोणत्याही मोठ्या प्रयोगशाळेची किंवा वैज्ञानिक पदवीची गरज न पडता, एआयच्या मदतीने एखादी विकृत व्यक्ती किंवा दहशतवादी संघटना अत्यंत धोकादायक जैविक विषाणू (Bio-weapons) तयार करू शकते. हे विषाणू जागतिक महासाथीचे रूप धारण करू शकतात, असा इशारा या टूल्सनी दिला.

चॅटजीपीटी : ओपनएआयच्या चॅटजीपीटीने इशारा दिला की, जर एआयचा वापर मोठ्या प्रमाणावर सायबर हल्ल्यांसाठी केला गेला, तर तो जगभरातील वीज ग्रीड्स, बँकिंग प्रणाली आणि दळणवळण यंत्रणा पूर्णपणे ठप्प करू शकतो. यामुळे संपूर्ण मानवी सभ्यता संकटात सापडू शकते. चारही एआय मॉडेल्सच्या उत्तरांचा मुख्य निष्कर्ष हाच होता की, समस्या एआयच्या स्वतःच्या विचारांत नसून मानवाच्या निष्काळजीपणात आहे. जर आपण मानवापेक्षा अधिक बुद्धिमान एआय तयार केला आणि त्यावरील आपले नियंत्रण गमावले, किंवा एआयने एखाद्या चुकीच्या व घातक आज्ञेचे तंतोतंत पालन केले, तर मानवी वंशासाठी परतण्याचा कोणताही मार्ग उरणार नाही, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT