नवी दिल्ली ः हृदयरोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि अनेक रुग्णांना योग्य रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्टेंटचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. हृदयाच्या आजारात स्टेंटचा वापर करण्यात येतो. हा बॉलपेनच्या स्प्रिंगच्या आकारासारखा असतो आणि आकुंचन पावलेल्या आर्टरीला दीर्घकाळ उघडी ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो, अशी माहिती हृदयरोग तज्ज्ञ देतात.
बैठी जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी, ताणतणाव आणि आनुवंशिक घटकांमुळे सर्वच वयोगटातील लोकांमध्ये हृदयविकाराच्या समस्या वाढत आहेत. कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD) सारख्या परिस्थिती, जिथे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात किंवा अरुंद होतात, त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि जीव गमवावा लागू शकतो. ब्लॉक झालेल्या धमन्यांसाठी सर्वात प्रभावी वैद्यकीय उपचार एक म्हणजे स्टेंट्सचा वापर करणे. धातूच्या अतिसूक्ष्म, जाळीदार कॉइल्स म्हणजेच स्टेंट या रक्तवाहिनीच्या उघडलेल्या भागामध्ये टाकल्या जातात. ब्लॉकेज होऊ नये आणि रक्ताभिसरण व्यवस्थितपणे सुरू राहावे यासाठी स्टेंटचा वापर केला जातो. स्टेंटिंगमुळे लक्षणे कमी करता येऊ शकतात आणि भविष्यातील गुंतागुंत टाळता येऊ शकते. त्याचप्रमाणे, हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान किंवा नंतर, रक्तपुरवठा पुनर्संचयित करण्यासाठी आणि हृदयाला होणारे भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी स्टेंट बसवता येतो.
पेरिफेरल आर्टरी डिसीज (PAD) असलेल्यांमध्ये देखील तज्ज्ञ स्टेंटिंगचा पर्याय सुचवतात. काही प्रकरणांमध्ये, रक्ताभिसरण सुधारण्यासाठी शरीराच्या इतर भागांमध्ये, जसे की पायांमध्ये अरुंद रक्तवाहिन्यांवर उपचार करण्यासाठी स्टेंटचा वापर केला जाऊ शकतो. स्टेंट्स ब्लॉक केलेल्या धमन्या उघडण्यास मदत करतात, ज्यामुळे ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयापर्यंत कार्यक्षमतेने पोहोचते आणि रक्त पंपिंग करण्याची क्रिया सुरळीतपणे होते. गंभीर एन्जाईना असलेल्या रुग्णांना स्टेंटिंग प्रक्रियेनंतर तत्काळ आराम मिळतो. ओपन-हार्ट सर्जरीच्या विपरीत, स्टेंटिंगसाठी फक्त एक लहान छिद्र पाडून केले जाते. त्यामुळे रुग्ण जलद बरा होतो. सुरळीत झालेल्या रक्ताभिसरणामुळे, रुग्णाची अस्वस्थता कमी होऊन हृदयाचे कार्य सुधारते व दैनंदिन कामांना पुन्हा सुरुवात करता येते. गुंतागुंत टाळण्यासाठी रुग्णांना तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रक्त पातळ करणारी आणि कोलेस्ट्रॉल कमी करणार्या औषधांचे सेवन करणे आवश्यक आहे. ही औषधे घेणे मध्येच थांबवू नये.