12000 Year Old Brain | मानवी मेंदू १२,००० वर्षे सुरक्षित राहतो कसा ?  
विश्वसंचार

12000 Year Old Brain | मानवी मेंदू १२,००० वर्षे सुरक्षित राहतो कसा ?

वैज्ञानिकांनी उलगडले रासायनिक रहस्य

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्‍ली : मानवी मृत्यूनंतर शरीरातील सर्वात आधी नष्ट होणाऱ्या किंवा कुजणाऱ्या अवयवांमध्ये ‘मेंदू’चा समावेश होतो. मात्र, पुरातत्त्वशास्त्रज्ञांना अनेक ऐतिहासिक उत्खननांमध्ये हजारो वर्षे जुने मानवी मेंदू सुस्थितीत सापडले आहेत, ज्यामुळे वैज्ञानिक वर्षानुवर्षे चक्रावून गेले होते. नुकत्याच झालेल्या एका नवीन संशोधनाने या गूढ रहस्यामागचे रासायनिक कारण स्पष्ट केले आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संशोधन ‘जर्नल ऑफ प्रोटीओम रिसर्च’मध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अलेक्झांड्रा मोर्टन-हेवर्ड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मेंदूच्या जतन प्रक्रियेचे विश्लेषण केले आहे. जगभरात आतापर्यंत सुमारे १२,००० वर्षे जुने ४,४०० हून अधिक मानवी मेंदू उत्खननात सापडले आहेत. आश्चर्यकारक बाब म्हणजे, १,३०० हून अधिक प्रकरणांमध्ये शरीराचे इतर सर्व मऊ उती (सॉफ्‍ट टिश्‍यूज) कुजून फक्त सांगाडा उरला होता, तरीही मेंदू सुरक्षित स्थितीत होता.

ऑक्सिजनची कमतरता आणि पाण्याचा चमत्कार

संशोधकांनी वेगवेगळ्या वातावरणात (ऑक्सिजन असणारे आणि ऑक्सिजन नसलेले ओले वातावरण) उंदरांच्या मेंदूवर प्रयोग केले. या संशोधनातून काही मुख्य बाबी समोर आल्या. ऑक्सिजनयुक्त वातावरणात प्रथिने (प्रोटिन्‍स) वेगाने नष्ट होतात आणि मेंदू कुजतो. ऑक्सिजनविरहित ओले वातावरण असेल तर अशा स्थितीत कुजण्याची नैसर्गिक प्रक्रिया थांबण्याऐवजी एका वेगळ्या रासायनिक मार्गाने जाते.

प्रोटीन क्रॉस-लिंकिंग म्हणजे काय?

मेंदूमध्ये विपुल प्रमाणात लिपिड्स (मेद/चरबी), प्रथिने आणि लोह किंवा तांब्यासारखे धातू असतात. ऑक्सिजन कमी असलेल्या दलदलीच्या किंवा ओल्या जमिनीत रासायनिक अभिक्रिया होऊन प्रथिनांचे साखळीसारखे जाळे तयार होते, ज्याला ‘क्रॉस-लिंकिंग’ म्हणतात. या प्रक्रियेमुळे मेंदूतील प्रथिने पाण्यात विरघळत नाहीत आणि जीवाणू (बॅक्‍टेरिया) किंवा वितळवणाऱ्या एन्झाईम्सना प्रतिकार करतात. थोडक्यात, कुजण्याची प्रक्रियाच मेंदूला नष्ट करण्याऐवजी त्याला एका नैसर्गिक ‘प्लास्टिक’सारख्या मजबूत संरचनेत रूपांतरित करते. विशेष म्हणजे, या संशोधनात जतन झालेल्या प्रथिनांची रचना मानवातील वृद्धत्व आणि अल्झायमरसारख्या न्यूरोडेव्हलपमेंटल आजारांमध्ये दिसणाऱ्या प्रथिनांच्या संरचनेशी जुळती-मिलती असल्याचे दिसून आले आहे. हे संशोधन केवळ पुरातत्त्वशास्त्रासाठीच नव्हे, तर फॉरेन्सिक सायन्स (न्यायवैद्यक शास्त्र) आणि भविष्यातील वैद्यकीय संशोधनासाठीही अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT