AI deathbots | ‘एआय’च्या जगात आलेत ‘डेथबॉटस्’; मृत्यूनंतरही प्रियजनांशी मारता येणार गप्पा! 
विश्वसंचार

AI deathbots | ‘एआय’च्या जगात आलेत ‘डेथबॉटस्’; मृत्यूनंतरही प्रियजनांशी मारता येणार गप्पा!

पुढारी वृत्तसेवा

लंडन: तंत्रज्ञानाने आज अशा एका टप्प्यावर मजल मारली आहे, जिथे एखादी व्यक्ती मृत्यूनंतरही आपल्या कुटुंबाशी संवाद साधू शकते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) मदतीने आता ‘डिजिटल जुळे’ किंवा ‘डेथबॉटस्’ तयार करणे शक्य झाले आहे. ही केवळ विज्ञानातील प्रगती नसून, मानवी भावनेचा एक नवा पैलू समोर आणणारे तंत्रज्ञान ठरत आहे.

डेथबॉटस् हे एक प्रकारचे संगणक प्रोग्राम आहेत, जे हुबेहूब एखाद्या व्यक्तीसारखा आवाज काढू शकतात, त्यांच्यासारखे दिसू शकतात आणि त्याच शैलीत मेसेजला उत्तरही देऊ शकतात. एखाद्या व्यक्तीचे जुने फोटो, व्हिडीओ आणि आवाजाचे नमुने वापरून हे तयार केले जातात. आता अशा कंपन्या आल्या आहेत जिथे तुम्ही जिवंत असतानाच तुमचे ‘डिजिटल प्रतिरूप’ तयार करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचे विचार, आवडी-निवडी आणि आठवणी रेकॉर्ड करून द्याव्या लागतात. व्यक्तीच्या निधनानंतर, तिचे कुटुंबीय कंपनीला माहिती देतात आणि त्यानंतर ते या डिजिटल रूपाशी अगदी खर्‍या माणसासारखे बोलू शकतात. या तंत्रज्ञानामुळे अनेक कायदेशीर प्रश्न उभे राहिले आहेत, ज्यांची उत्तरे सध्या तरी उपलब्ध नाहीत:

मालकी हक्क : सध्याचा कायदा तुमचा आवाज किंवा व्यक्तिमत्त्व याला जमीन किंवा घरासारखी तुमची ‘मालमत्ता’ मानत नाही. कॉपीराईटचा पेच : तुम्ही स्वतः रेकॉर्ड केलेल्या आवाजावर तुमचा हक्क आहे; पण ‘एआय’ स्वतःहून जे नवीन संवाद तयार करेल, त्यावर कॉपीराईट मिळवणे कठीण आहे. जर भविष्यात संबंधित कंपनी बंद झाली किंवा तंत्रज्ञान बदलले, तर तुमचे डिजिटल रूपही कायमचे नष्ट होईल. यामुळे कुटुंबाला पुन्हा एकदा व्यक्ती गमावल्याचे दुःख सहन करावे लागू शकते. या तंत्रज्ञानाचे परिणाम केवळ कायदेशीर नाहीत, तर ते मानसिक आणि सामाजिकद़ृष्ट्याही गंभीर असू शकतात : स्वभावातील बदल : एआय हे शेवटी सॉफ्टवेअर आहे. काळानुसार ते कदाचित अशा गोष्टी बोलू लागेल, ज्या तुमच्या मूळ विचारांच्या किंवा स्वभावाच्या विरुद्ध असतील. आठवणींचा विळखा : मृत व्यक्तीच्या विरहातून बाहेर पडण्याऐवजी, कुटुंबीय त्या एआयवर इतके अवलंबून राहू शकतात की, त्यांना सामान्य जीवनात परतणे कठीण होईल. जबाबदारी कोणाची?: जर एआयने भविष्यात काही वादग्रस्त किंवा दुःखद विधान केले, तर त्याची कायदेशीर जबाबदारी कोणाची असेल, कंपनीची की युजरची? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एकूणच, हे तंत्रज्ञान मृत व्यक्तीच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी एक वरदान ठरू शकते, की तो एक मानसिक सापळा ठरेल, यावर आता चर्चा रंगू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT