विश्वसंचार

लघुग्रह कसे बनतात आणि कसे होतात नष्ट?

Arun Patil

वॉशिंग्टन : अंतराळात इतस्ततः फिरत असलेल्या लहान-मोठ्या शिळांना लघुग्रह (अ‍ॅस्टेरॉईड) असे म्हटले जाते. मंगळ आणि गुरू या ग्रहांदरम्यान अशा अवकाशीय शिळांचा एक पट्टाच आहे. त्याला 'अ‍ॅस्टेरॉईड बेल्ट' असेच नाव आहे. हे लघुग्रह कोट्यवधी वर्षांपासून अस्तित्वात असू शकतात. असे काही लघुग्रह वेळोवेळी पृथ्वीजवळूनही जात असतात. अशाच एका लघुग्रहाच्या धडकेने पृथ्वीवरून डायनासोर नष्ट झाले होते. हे लघुग्रह कसे टिकून राहतात व ते कसे नष्ट होतात याबाबतही संशोधकांना कुतुहल आहे.

ऑक्टोबर 2020 मध्ये 'नासा'चे 'ओसिरिस-रेक्स' अंतराळयान 'बेन्नू' नावाच्या लघुग्रहाजवळ गेले होते. सुमारे दोन वर्षे ते 'बेन्नू' भोवती फिरत होते. त्यानंतर या यानाच्या रोबोटिक आर्मने म्हणजे यांत्रिक भुजेने लघुग्रहावरील धूळ व खडकांचे एकूण 2 किलो वजनाचे नमुने गोळा केले. अमेरिकेच्या एखाद्या अंतराळ मोहिमेत गोळा करण्यात आलेले हे लघुग्रहाचे पहिलेच नमुने होते. या नमुन्यांच्या अभ्यासावरून आता बेन्नूसारखे लघुग्रह किती जुने आहेत, ते किती काळ अस्तित्वात राहतात यासारख्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील. हे लघुग्रह किती काळ टिकून राहतात हे जाणून घेण्यासाठी आधी ते कसे बनतात हे समजणे गरजेचे आहे.

आपल्या सौरमालिकेतील लघुग्रह हे 'प्रोटोप्लॅनेटरी डिस्क' पासून आलेले आहेत. 4.5 अब्ज वर्षांपूर्वी ज्यावेळी सूर्याभोवती धूळ आणि खडकाळ सामग्रीचा जाड थर फिरत होता त्यावेळी त्यापासूनच वेगवेगळे ग्रह निर्माण झाले. या जाड थरालाच 'प्रोटोप्लॅनेटरी डिस्क' म्हटले जाते. या तबकडीतूनच ग्रहांचा जन्म झाला. न्यू जर्सीमधील रोवन युनिव्हर्सिटीतील हेरॉल्ड कोन्नोली यांनी सांगितले की पृथ्वीवर ज्याप्रमाण बर्फाचे अनेक कण एकत्र येऊन 'स्नोबॉल' बनतो तशाच पद्धतीने अंतराळातील हे धुलीकण एकत्र येत त्यापासून हे लघुग्रह बनले.

आपल्या सौरमालिकेतील बहुतांश लघुग्रह हे सध्या मंगळ व गुरुदरम्यानच्या 'अ‍ॅस्टेरॉईड बेल्ट'मध्येच आहेत. कधी कधी त्यामधून काही लघुग्रह बाहेरही फेकले जातात. असे लघुग्रहच नंतर पृथ्वीजवळूनही जातात व त्यांनाच 'नियर-अर्थ अ‍ॅस्टेरॉईड' म्हटले जाते. काही मोठे लघुग्रह तर आपल्या सौरमालिकेइतके जुने म्हणजे 4.5 अब्ज वर्षांपूर्वीचे आहेत. लघुग्रह हे तुटू शकतात आणि कधी कधी वेगवेगळ्या मार्गाने नष्टही होऊ शकतात. काही वेळा ते स्वतःभोवती फिरत राहिल्यानेही नष्ट होतात. लघुग्रह हे बहुतांश अनियमित आकाराचे असतात. त्यांच्याकडेही गुरुत्वाकर्षण शक्ती असते व ते एखाद्या खगोलाकडेही आकर्षित होऊ शकतात. त्यामुळे ते एका बाजूला कललेले असतात. जर ते एखाद्या धडकेनंतरही फिरू लागले किंवा सोलर रेडिएशनमुळे ढकलले गेले तर त्यांचे तुकडे उडू शकतात!

SCROLL FOR NEXT