Australia Continental Fragment |ऑस्ट्रेलियाच्या छोट्या तुकड्यामुळे बनली आग्नेय आशियातील जंगले  Manfred Gottschalk
विश्वसंचार

Australia Continental Fragment |ऑस्ट्रेलियाच्या छोट्या तुकड्यामुळे बनली आग्नेय आशियातील जंगले

नवीन संशोधनातून मोठा खुलासा

पुढारी वृत्तसेवा

कॅनबेरा : अंबरमध्ये म्हणजेच झाडाच्या घट्ट झालेल्या डिंकामध्ये जतन असलेल्या प्राचीन वनस्पतींच्या जीवाश्मांमुळे एक रंजक बाब समोर आली आहे. आग्नेय आशियातील उष्णकटिबंधीय जंगलांची समृद्ध जैवविविधता ही सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वी आजच्या वायव्य ऑस्ट्रेलियापासून विलग झालेल्या पृथ्वीच्या भूपर्पटीच्या (crust) एका छोट्या तुकड्यामुळे अस्तित्वात आली आहे, असे एका नवीन अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

या संशोधनानुसार, या छोट्या भूतुकड्याने शेकडो फुलांच्या प्रजाती आणि इतर प्राचीन वनस्पतींचा समृद्ध संग्रह प्राचीन टेथिस महासागरावरून उत्तरेकडे वाहून नेला. हा शोध जुन्या सिद्धांतांना छेद देणारा आहे. यापूर्वी असा अंदाज वर्तवला जात होता की, हा भूभाग आग्नेय आशियाच्या जवळून तयार झाला होता आणि डायनासोरच्या नामशेष झाल्यानंतर (सुमारे ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी) आग्नेय आशियातील उष्णकटिबंधीय जंगले विकसित झाली होती. ज्यावेळी हा तुकडा तयार झाला, तेव्हा ऑस्ट्रेलिया प्राचीन 'गोंडवाना' महाद्वीपाचा भाग म्हणून अंटार्क्टिका आणि भारताशी जोडलेला होता. टेथिस महासागराने या गोंडवाना महाद्वीपाला 'लॉरेशिया' नावाच्या दुसर्‍या प्राचीन महाद्वीपापासून वेगळे केले होते.

सुमारे १०० दशलक्ष वर्षे उत्तर दिशेने प्रवास केल्यानंतर हा मायक्रोप्लेट (सूक्ष्म भूतुकडा) आग्नेय आशियावर आदळला, ज्यामुळे आजच्या या भागातील हिरवीगार आणि समृद्ध परिसंस्था विकसित झाल्या, असे संशोधकांनी सांगितले. या अभ्यासाचे सहलेखक आणि ऑस्ट्रेलियाच्या कर्टिन युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मॉलिक्यूलर अँड लाईफ सायन्सेसचे प्रतिष्ठित प्राध्यापक इमर्जिटस बायरन लामोंट यांनी सांगितले, "आग्नेय आशियातील समृद्ध उष्णकटिबंधीय वर्षावनांची वनस्पती ही स्थानिक नाही, तर तिची बहुतांश जैवसंपत्ती महान दक्षिण भूमी 'गोंडवाना'कडून आली आहे." मात्र, आग्नेय आशियासोबत झालेला हा प्रवास आणि टक्कर अजिबात सोपी नव्हती, असे लामोंट यांनी स्पष्ट केले.

हा भूतुकडा, ज्याला त्याच्या पश्‍चिम म्यानमारमधील स्थितीमुळे 'वेस्ट बर्मा ब्लॉक' (WBB) किंवा 'बर्मा टेरान' म्हणून ओळखले जाते, तो टेथिस महासागरावरून प्रवास करणारा एकमेव तुकडा नव्हता. याच सुमारास भारतीय उपखंडही उत्तरेकडे वेगाने सरकत होता, ज्याचा वेग दरवर्षी सुमारे ४ इंच (१० सेंटिमीटर) इतका होता. सुमारे ८० दशलक्ष वर्षांपूर्वी भारतीय प्लेटने 'वेस्ट बर्मा ब्लॉक'ला (WBB) धडक दिली, ज्यामुळे या तुकड्याची दिशा बदलली. यानंतर भारतीय प्लेट सतत WBB ला ढकलत राहिली, जोपर्यंत हे दोन्ही भूभाग आशियावर आदळले नाहीत. पुढे जाऊन भारतीय प्लेट युरेशियन प्लेटच्या खाली सरकली, ज्यामुळे हिमालयाची निर्मिती झाली, तर WBB हा आजच्या म्यानमारच्या पश्चिमेकडे येऊन थांबला, जिथे सुमारे ३५ दशलक्ष वर्षांपूर्वी पर्वतरांगांच्या दरम्यान एक खोल दरी निर्माण झाली, असे लामोंट यांनी शेवटी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT