वेलिंग्टन : वर्ष २०२८ येण्यासाठी अजून दोन वर्षांचा कालावधी बाकी असला, तरी न्यूझीलंडमधील ‘डुनेडिन’ हे शहर आतापासूनच प्रचंड चर्चेत आले आहे. याचे कारण म्हणजे २२ जुलै २०२८ रोजी दिसणारे अतिशय दुर्मीळ ‘खग्रास सूर्यग्रहण'. ही अद्भुत खगोलीय घटना ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी जगभरातील लोक आतापासूनच आपल्या प्रवासाचे नियोजन करत आहेत. परिस्थिती अशी आहे की, शहरातील अनेक हॉटेल्समध्ये ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे, तर काही विशेष पॅकेजेस तर पूर्णपणे ‘सोल्ड आऊट' झाली आहेत.
२२ जुलै २०२८ रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी ४.१७ वाजता चंद्र पूर्णपणे सूर्याच्या समोर येईल. यामुळे सुमारे १०० किलोमीटर रुंदीची सावली दक्षिण न्यूझीलंडच्या भागातून जाईल. या सावलीच्या टप्प्यात येणाऱ्या डुनेडिन आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ क्वीन्सटाऊनसारख्या शहरांमध्ये दुपारी सुमारे २ मिनिटे ५१ सेकंद पूर्ण काळोख पसरणार आहे. हा नजारा लाखो लोकांसाठी आयुष्यात एकदाच मिळणारा अविस्मरणीय अनुभव मानला जात आहे. या सूर्यग्रहणाबाबत लोकांमध्ये इतका उत्साह आहे की, डुनेडिनमधील हॉटेल्स बुकिंगच्या विनंत्यांनी भरू लागली आहेत. ‘डुनेडिन लेजर लॉज'चे विशेष ‘सोलार एक्लिप्स पॅकेज’ आधीच पूर्णपणे विकले गेले आहे.
या पॅकेजमध्ये पाहुण्यांना ग्रहण पाहण्यासाठी विशेष सुरक्षा चष्मे (Eclipse Glasses) देखील दिले जात आहेत. 'तुहुरा ओटागो म्युझियम'चे संचालक आणि खगोलशास्त्रज्ञ डॉ. इयान ग्रिफिन यांच्या मते, डुनेडिन शहरासाठी हा एक ऐतिहासिक क्षण असेल. त्यांनी सांगितले की, या भागातून शेवटच्या वेळी ११६३ मध्ये म्हणजेच तब्बल ८५० वर्षांपूर्वी असे खग्रास सूर्यग्रहण दिसले होते. त्यावेळी न्यूझीलंडमध्ये मानवी वस्तीही पोहोचली नव्हती. त्यामुळे सध्याची पिढी या शहरातून खग्रास सूर्यग्रहण पाहणारी पहिलीच पिढी ठरणार आहे. जर त्या दिवशी आकाश निरभ्र राहिले तर सुमारे तीन मिनिटे पसरणारी ही सावली लोकांच्या आयुष्यातील सर्वात आठवणीत राहणाऱ्या घटनांपैकी एक ठरेल.