Hospital Negligence | रुग्णालयाच्या एका चुकीमुळे जन्माच्या वेळीच बदलली मुले  
विश्वसंचार

Hospital Negligence | रुग्णालयाच्या एका चुकीमुळे जन्माच्या वेळीच बदलली मुले

३८ वर्षांनंतर ‘डीएनए’ टेस्टमुळे समोर आले धक्कादायक सत्य

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेतील नॉर्थ डकोटा राज्यातील ग्राफ्टन शहरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथील ‘युनिटी मेडिकल सेंटर’मध्ये सुमारे ३८ वर्षांनंतर उघडकीस आलेल्या एका सत्य घटनेने दोन्ही कुटुंबांना हादरवून सोडले आहे. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे जन्माच्या वेळीच दोन नवजात मुलांची अदलाबदली झाली आणि दोन्ही मुले दुसऱ्याच कुटुंबासोबत त्यांच्या घरी गेली. तब्बल ३८ वर्षांनंतर एका डीएनए चाचणीमुळे हा प्रकार समोर आला असून, आता दोन्ही कुटुंबे न्यायालयात पोहोचली आहेत.

‘फॉक्स न्यूज’च्या अहवालानुसार, ही घटना २६ जानेवारी १९८८ रोजी घडली होती. त्या दिवशी युनिटी मेडिकल सेंटरमध्ये फक्त दोनच मुलांचा जन्म झाला होता. पुढे जाऊन या मुलांची नावे ‘काईल बायलिन’ आणि ‘जेरेमी मॉरिसन’ अशी ठेवण्यात आली. कुटुंबाचा आरोप आहे की, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताना कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे या दोन्ही मुलांची अदलाबदली झाली. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, इतका मोठा बदल होऊनही कित्येक दशके कोणालाच काही संशय आला नाही. दोन्ही मुले आपापल्या कुटुंबात मोठी झाली, शाळेत गेली, नोकरी लागली, मित्र बनवले आणि आयुष्य जगत राहिली. आपण ज्यांच्यासोबत राहत आहोत ते आपले खरे आई-वडील नाहीत, याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. मात्र, जेरेमी मॉरिसनला लहानपणापासूनच आपण कुटुंबातील इतर लोकांपेक्षा वेगळे दिसतो, असे वाटायचे.

‘माझ्या कुटुंबातील जवळपास सर्वांचे केस गडद रंगाचे होते, तर माझे केस सोनेरी होते. माझा चेहरा कुटुंबातील इतर सदस्यांशी जुळत नसल्याचे मला अनेकदा जाणवायचे. लहानपणी हे नक्कीच विचित्र वाटायचे, पण त्यामागे एवढे मोठे कारण असेल असे कधी वाटले नव्हते,’ असे जेरेमी मॉरिसन याने सांगितले. सुमारे दोन वर्षांपूर्वी, म्हणजेच वयाच्या ३६ व्या वर्षी काईल बायलिनने सहज उत्सुकतेपोटी आपली डीएनए चाचणी केली. त्याला वाटले की यामुळे आपल्या वंशावळीबद्दल काही अधिक माहिती मिळेल; परंतु रिपोर्ट पाहताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. डीएनए रिपोर्टमध्ये त्याचे नाते एका अशा अनोळखी महिलेशी जोडले गेले होते, ज्याला तो ओळखतही नव्हता. तपास पुढे गेला तेव्हा ती महिला त्याची सख्खी आत्या असल्याचे समोर आले. येथूनच या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. याशिवाय, काईलकडे जन्माच्या वेळी हातावर बांधलेली रुग्णालयाची आयडेंटिटी पट्टी अजूनही सुरक्षित होती, ज्यावर चुकीचे नाव नोंदवले गेले होते.

हाच या प्रकरणातील पहिला मोठा पुरावा ठरला. जेरेमी मॉरिसन सध्या अमेरिकेतील कोलोरॅडो येथे राहतो. तो म्हणतो, ‘जर जन्माच्या वेळी ही चूक झाली नसती, तर माझे आयुष्य पूर्णपणे वेगळे असते. मी नॉर्थ डकोटातच राहून माझ्या खऱ्या मोठ्या भावासोबत कुटुंबाची शेती सांभाळली असती. रुग्णालयाच्या एका चुकीने माझ्या आयुष्याची दिशाच बदलून टाकली.’ सत्य समोर आल्यानंतर दोन्ही मुले आपापल्या खऱ्या आई-वडिलांना भेटली. कुटुंबीयांनी एकमेकांचे स्वागत केले असले, तरी ३६ वर्षांनंतर अचानक नाती बदलणे सोपे नव्हते. ही पहिली भेट अत्यंत भावुक आणि तितकीच अवघड होती. विशेष म्हणजे, या दोन्ही पुरुषांची अजूनही समोरासमोर भेट झालेली नाही. सत्य समजल्यानंतर दोन्ही कुटुंबांनी सुरुवातीला रुग्णालयाशी सामोपचाराने चर्चा करण्याचा प्रयत्न केला. सुमारे वर्षभर नुकसानभरपाईबाबत चर्चा झाली, मात्र रुग्णालयाकडून कोणताही ठोस प्रतिसाद न मिळाल्याने अखेर दोन्ही कुटुंबांनी रुग्णालयाविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. दुसरीकडे, युनिटी मेडिकल सेंटरने या घटनेमुळे कुटुंबांना झालेल्या भावनिक त्रासाबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे; परंतु स्वतःवर असलेले आरोप फेटाळून लावत हा खटला रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT