उन्हात उभी असलेली गाडी स्वतः तयार करणार ४०० युनिट वीज  
विश्वसंचार

Electric Car : उन्हात उभी असलेली गाडी स्वतः तयार करणार ४०० युनिट वीज

चिनी कंपनी ‘होंगकी’ची जगातील पहिली सोलर पॅनोरमिक सनरुफ असलेली कार

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : चीनमधील प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी ‘होंगकी’ने (‘FAW Hongqi) ने ऑटोमोबाईल क्षेत्रात एक अभूतपूर्व कामगिरी केली आहे. कंपनीने ‘पेरोव्स्काइट’ (Perovskite) तंत्रज्ञानावर चालणारे जगातील पहिले सोलर पॅनोरमिक सनरूफ विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी ‘Hongqi EHS7’ या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये (SUV) करण्यात आली आहे. भविष्यात हे तंत्रज्ञान इलेक्ट्रिक गाड्यांना केवळ सूर्यप्रकाशाच्या मदतीनेच अधिक धावण्याची क्षमता (Range) देईल, असा दावा कंपनीने केला आहे. हे विशेष सोलर सनरूफ उन्हात दररोज ३०० व्हॉटपर्यंत (300W) रिअल-टाईम वीज निर्माण करते. कंपनीच्या माहितीनुसार, हे सनरूफ वर्षाला तब्बल ४०० केडब्ल्यूएच (kWh किंवा युनिट) स्वच्छ वीज निर्माण करू शकते.

या विजेच्या मदतीने कारमधील एअर कंडिशनर (AC), मिनी फ्रिज आणि सिक्युरिटी कॅमेरे (Sentry Mode) यांसारखी फीचर्स सहज चालतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यासाठी कारच्या मुख्य बॅटरीमधील ऊर्जा वापरण्याची गरज भासणार नाही. आतापर्यंत गाड्यांमध्ये सिलिकॉनपासून बनवलेले पॅनेल वापरले जात होते, जे वजनाने जड असतात आणि लवकर फुटू शकतात. मात्र ‘होंगकी’ने या नव्या सनरूफमध्ये ‘पेरोव्स्काइट’ नावाच्या विशेष खनिजाचा वापर केला आहे. हा पदार्थ कागदासारखा पातळ, लवचिक आणि अत्यंत हलका आहे. हा सूर्यप्रकाशापासून अधिक वेगाने वीज तयार करतो आणि कारच्या वळणदार छतावर सहज फिट होतो, हेच याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.

सोलर पॅनोरमिक सनरूफ म्हणजे सोप्या भाषेत कारच्या छतावर बसवलेला एक मोठा काचेचा पॅनेल. हा मटेरियल अतिनील किरणे, पाणी आणि वाऱ्यामुळे खराब होण्याचा धोका असतो. मात्र, ‘होंगकी’ च्या संशोधन पथकाने या आव्हानांवर मात करत ‘Hongqi EHS7’ (चिनी नाव : Tiangong 08) या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये या तंत्रज्ञानाचा प्रोटोटाईप यशस्वीपणे फिट केला आहे. ‘CarNewsChina’ मधील वृत्तानुसार, कंपनी केवळ छतापुरती सीमित राहू इच्छित नाही. ‘होंगकी’ची पुढील योजना हे सोलर तंत्रज्ञान कारच्या बोनेट आणि इतर भागांवरही बसवण्याची आहे. संपूर्ण सिस्टीम बसवल्यानंतर ही कार दररोज १० युनिट वीज तयार करेल. याचा अर्थ कार केवळ सूर्यप्रकाशाच्या जोरावर दररोज ८० किलोमीटरपर्यंत धावू शकेल. त्यामुळे दैनंदिन प्रवासासाठी वारंवार चार्जिंग स्टेशनवर जाण्याची गरजच उरणार नाही.

चार्जिंग तंत्रज्ञानात आणणार क्रांती

चीनमधील सर्वात जुना आणि प्रतिष्ठित लक्झरी कार ब्रँड असलेला ‘होंगकी’ केवळ सोलर रूफपुरता मर्यादित नाही. कंपनी अशा ‘फ्लॅश चार्जिंग’ तंत्रज्ञानावर काम करत आहे, ज्यामुळे बॅटरी अवघ्या ९ मिनिटांत १० टक्क्यांवरून ९७ टक्क्यांपर्यंत चार्ज होईल. यासोबतच नव्या पिढीच्या ‘सॉलिड-स्टेट बॅटरी’वरही वेगाने चाचण्या सुरू आहेत. मात्र, हे तंत्रज्ञान सामान्य ग्राहकांसाठी शोरूममध्ये कधी उपलब्ध होईल, हे कंपनीने स्पष्ट केलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT