Hollywood Stars Homes | दोनशे वर्षे जुन्या गोदामांतील लाकडापासून बनवले हॉलीवूड स्टार्सचे घर  
विश्वसंचार

Hollywood Stars Homes | दोनशे वर्षे जुन्या गोदामांतील लाकडापासून बनवले हॉलीवूड स्टार्सचे घर

‘बॅटमॅन’च्या दिग्दर्शकाने उभारली होती अनोखी वास्तू

पुढारी वृत्तसेवा

लॉस एंजेलिस : हॉलीवूड कलाकारांचे आलिशान बंगले नेहमीच चर्चेत असतात. मात्र, काही घरे त्यांच्या अनोख्या स्थापत्यशैलीमुळे आणि वेगळेपणामुळे विशेष लक्ष वेधून घेतात. प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेते रायन गॉसलिंग आणि ईव्हा मेंडेस यांच्याकडे असेच एक पर्यावरणपूरक व वैशिष्ट्यपूर्ण घर आहे. २०१४ पासून हे जोडपे या घरात राहत असून, जुन्या लाकडांचा पुनर्वापर करून उभारलेली ही वास्तू वास्तुकलेचा एक उत्तम आदर्श मानली जाते.

शेतीमाल आणि धान्य साठवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोदामांना (बार्न) अमेरिकेत लाकडाचा वापर करून बांधले जाते. हे घर उभारण्यासाठी २०० हून अधिक वर्षे जुन्या अशा तीन लाकडी गोदामांमधील लाकडाचा पुनर्वापर करण्यात आला. रायन गॉसलिंग आणि ईव्हा मेंडेस यांनी २०१४ मध्ये हे घर खरेदी केले असले, तरी कॅलिफोर्नियातील या अनोख्या घराची मूळ उभारणी प्रसिद्ध ‘बॅटमॅन’ चित्रपटांचे दिग्दर्शक जोएल शूमाकर यांनी केली होती. या घराची बांधणी आणि त्यासाठी वापरलेले साहित्य अत्यंत अद्वितीय होते.

कॅलिफोर्नियातील या घराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याची लाकडी चौकट (वूडन फ्रेम) आणि त्यातील भक्कम लाकडी तुळ्या. ही सर्व लाकडे ओहायो येथील जुन्या लाकडी गोदामांतून मागवण्यात आली होती. इंटेरियर डिझायनर डॉन कपाम्ब्वे यांनी या घराच्या अंतर्गत रचनेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. २००३ च्या ‘आर्किटेक्चरल डायजेस्ट’मधील वृत्तानुसार, लाकडाचे भव्य तुकडे विशेष वाहनांद्वारे प्रत्यक्ष बांधकाम स्थळावर आणले गेले होते. या घराचे छप्पर बरेच उंच असून, त्याला दिलेले लाकडी टेकू स्पष्ट दिसतात.

घरातील शेकोटी (फायरप्लेस) शेजारील नदीतून आणलेल्या दगडांनी तयार करण्यात आली आहे. मोठ्या काचेच्या खिडक्या आणि खडबडीत दगडी पृष्ठभाग यामुळे घराला कोणत्याही आधुनिक बंगल्याऐवजी एका शांत, पारंपारिक आणि निसर्गरम्य घराचे रूप मिळाले आहे. रायन गॉसलिंग आणि ईव्हा मेंडेस यांनी २०१४ मध्ये जेव्हा हे घर विकत घेतले, तेव्हा त्यांना लॉस एंजेलिस शहराच्या गजबजाटापासून लांब जाऊन शांततेत राहायचे होते. या जोडप्याला आपल्या मुलांसाठी एका सुरक्षित आणि खासगी वातावरणाची गरज होती. दरम्यान, ही अनोखी वास्तु निर्माण करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक जोएल शूमाकर यांचे २०२० मध्ये निधन झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT