वॉशिंग्टन : एड्ससारख्या जागतिक आरोग्य समस्येवर मात करण्याच्या दिशेने वैद्यकीय क्षेत्राने एक मोठे पाऊल टाकले आहे. शास्त्रज्ञांनी mRNA तंत्रज्ञानावर आधारित नवीन एचआयव्ही लसी विकसित केल्या असून, त्यांच्या प्रयोगशाळेतील प्राणी आणि मानवी स्वयंसेवकांवरील चाचण्यांमध्ये अत्यंत उत्साहवर्धक परिणाम दिसून आले आहेत. या यशामुळे एड्ससारख्या आयुष्यभर शरीराला ग्रस्त करणार्या विषाणूजन्य आजाराला प्रतिबंध करण्याचा एक प्रभावी मार्ग सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या प्रायोगिक लसींनी सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये शरीरात प्रभावी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण केली असून, त्यांचे दुष्परिणामही नगण्य असल्याचे दिसून आले आहे.
‘सायन्स ट्रान्सलेशनल मेडिसिन’ या प्रतिष्ठित जर्नलमध्ये बुधवारी (30 जुलै) प्रकाशित झालेल्या दोन अभ्यासांमध्ये या नवीन लसींबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पहिला टप्पा (प्राण्यांवरील चाचणी): पहिल्या अभ्यासात काही लसींची ससे आणि माकडांवर चाचणी करण्यात आली. या चाचण्यांमध्ये मिळालेल्या सकारात्मक परिणामांमुळे शास्त्रज्ञांना पुढील संशोधनासाठी प्रोत्साहन मिळाले आणि मानवी चाचण्यांचा मार्ग मोकळा झाला. दुसरा टप्पा (मानवी चाचणी) : यानंतर 100 हून अधिक निरोगी मानवी स्वयंसेवकांवर तीन वेगवेगळ्या लसींची चाचणी करण्यात आली. प्राण्यांवर वापरलेल्या लसींसारख्याच या लसी होत्या. या चाचण्यांनी एचआयव्ही संसर्ग रोखण्यासाठी एक सुरक्षित आणि प्रभावी लस विकसित करण्याच्या जागतिक प्रयत्नांमध्ये ‘महत्त्वपूर्ण प्रगती’ दर्शवली आहे, असे मत क्वीन्सलँड विद्यापीठातील ऑस्ट्रेलियन mRNA कॅन्सर वॅक्सिन सेंटरचे संचालक सेठ चीथम यांनी व्यक्त केले.
या संशोधनात थेट सहभागी नसलेले सेठ चीथम पुढे म्हणाले, ‘एचआयव्हीवरील उपचार आणि प्रतिबंधात्मक औषधांमुळे रुग्णांच्या जीवनात मोठे बदल झाले असले, तरी एका प्रभावी लसीची अत्यंत तातडीची गरज आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या (WHO) आकडेवारीनुसार, गेल्या दशकात नवीन एचआयव्ही संसर्गाच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. मात्र, आजही दरवर्षी लाखो लोकांना याची लागण होते. 2024 च्या आकडेवारीनुसार, जगभरात अंदाजे 13 लाख लोकांना एचआयव्हीचा संसर्ग झाला, ज्यात सुमारे 1 लाख 20 हजार मुलांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत, एक प्रभावी एचआयव्ही लस क्रांतिकारी ठरू शकते. या लसीचे काही डोस जरी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून विषाणूला सुरुवातीलाच रोखण्यात यशस्वी ठरले, तर एड्सविरुद्धच्या लढाईला एक नवी दिशा मिळेल. हे संशोधन त्याच दिशेने टाकलेले एक मोठे आणि आशादायक पाऊल मानले जात आहे.