लंडन : इतिहासातील सर्वाधिक अभ्यासल्या गेलेल्या व्यक्तींपैकी एक असलेल्या जर्मनीचा हुकूमशाह अॅडॉल्फ हिटलरच्या खासगी आयुष्याबद्दल आणि लैंगिक विकारांबद्दल नवीन आणि निर्णायक माहिती समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ आणि इतिहासकारांच्या एका पथकाने हिटलरच्या डीएनएचे विश्लेषण केले आहे. अनुवंशशास्त्रज्ञ प्रोफेसर तुरी किंग यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या अभ्यासातील निष्कर्षांमुळे हिटलरबद्दलच्या असणार्या माहितीत आणखी भर पडली आहे.
हे विश्लेषण हिटलरच्या बर्लिन बंकरमधील रक्त लागलेल्या सोफ्याच्या फॅब्रिकच्या तुकड्यावरून प्राप्त झालेल्या डीएनएवर आधारित आहे. विश्लेषणानुसार, हिटलरला कॉलमन सिंड्रोम असण्याची मोठी शक्यता आहे. हा जनुकीय विकार व्यक्तीला तारुण्य पूर्ण करण्यापासून किंवा सुरू करण्यापासून प्रतिबंधित करतो. या अभ्यासात पीआरओके-2 नावाचे जनुक हिटलरच्या डीएनएमध्ये कमी असल्याचे आढळले, जे लैंगिक अवयवांच्या विकासाशी संबंधित आहे. या जनुकाच्या अनुपस्थितीमुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी सामान्यपेक्षा कमी होते आणि परिणामी मायक्रो-पेनिस होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ज्यू वंशाची अफवा ठरली निराधार
हिटलरच्या लैंगिक विकृतींबद्दल पहिल्या महायुद्धापासून अफवा पसरल्या होत्या, त्यापैकी एक म्हणजे तो ज्यू वंशाचा होता. मात्र, डीएनए विश्लेषणातून हे निश्चित झाले आहे की, हिटलर कोणत्याही प्रकारे ज्यू वंशाशी संबंधित नव्हता. या संशोधनात असेही आढळले की, हिटलरचा पॉलीजेनिक रिस्क स्कोअर हा ऑटिझम, स्किझोफ्रेनिया आणि बायपोलर डिसऑर्डर यांसारख्या मानसिक विकारांसाठी जास्त होता. या निष्कर्षांवर, प्रोफेसर किंग आणि ऑटिझम तज्ज्ञ प्रोफेसर सर सायमन बॅरन-कोहेन यांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. प्रोफेसर किंग यांनी स्पष्ट केले की, तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा जनुकीय भाग हा एक हिस्सा आहे. हिटलरचे वडील दारू पिऊन मारहाण करायचे, त्याचे भाऊ-बहीण वारले, आईचा मृत्यू झाला आणि तो ज्या काळात जगत होता, या सर्व बाह्य घटकांचा त्याच्यावर परिणाम झाला. प्रोफेसर बॅरन-कोहेन यांनी म्हटले आहे की, या मानसिक विकारांना हिटलरच्या क्रूरतेशी जोडणे चुकीचे आहे. कारण, या विकारांनी ग्रस्त असलेले बहुसंख्य लोक हिंसक नसतात. या संशोधनाचे निष्कर्ष ‘हिटलर्स डीएनए : ब्ल्यू प्रिंट ऑफ ए डिक्टेटर’ या माहितीपटातून प्रसारित होणार आहेत.