Watermelon history | कलिंगड भारतात कुठून आले? 
विश्वसंचार

Watermelon history | कलिंगड भारतात कुठून आले?

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली ः उन्हाळा सुरू झाला की बाजारात सगळ्यांची नजर कलिंगडकडे असते. लाल गर, भरपूर पाणी आणि नैसर्गिक गोडवा यामुळे कलिंगड हे केवळ फळ नसून उन्हाळ्यातील सर्वात मोठा दिलासा मानले जाते. आज जगभरात दरवर्षी कोट्यवधी टन कलिंगडाची लागवड केली जाते. या फळाच्या 1200 हून अधिक जाती आढळतात. काही कलिंगड आकाराने मोठी असतात, काही लहान; तर काहींचा गर गडद लाल, पिवळा किंवा गुलाबी रंगाचाही असतो. हे फळ भारतात कुठून आले हे माहिती आहे का?

कलिंगडाचा इतिहासही तितकाच रंजक आहे. हे फळ आजचं नसून तब्बल पाच हजार वर्षांपूर्वीपासून मानवाच्या आहाराचा भाग असल्याचे मानले जाते. इतिहासकारांच्या मते, कलिंगडाची सर्वात पहिली लागवड प्राचीन इजिप्तमध्ये झाली होती. तेथील पुरातत्त्व उत्खननांमध्ये कलिंगडाच्या बियांचे अवशेष सापडले आहेत. इतकंच नाही, तर जुन्या शिलालेखांमध्ये आणि चित्रांमध्येही विविध प्रकारच्या टरबूजांचा उल्लेख आढळतो. त्या काळात आफ्रिकेतील व्यापारी आणि प्रवासी वाळवंटातून प्रवास करताना कलिंगडाच्या बिया इतर प्रदेशांत घेऊन गेले.

नाईल नदीच्या काठावर शेती करणार्‍या लोकांनी या फळाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आणि हळूहळू ते संपूर्ण आफ्रिकेत पसरले. पुढे व्यापारमार्गांमुळे कलिंगड आशियातही पोहोचले. 9व्या शतकात चीनमध्ये कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू झाली. त्या काळातील चिनी साहित्यामध्ये या फळाचा उल्लेख आढळतो. त्यानंतर भारतासह अनेक आशियाई देशांमध्ये कलिंगड लोकप्रिय झाले. प्राचीन ग्रीक आणि रोमन संस्कृतीतही या फळाला विशेष महत्त्व दिले गेले आणि ते त्यांच्या आहारसंस्कृतीचा भाग बनले. विशेष म्हणजे ‘वॉटरमेलन’ हा शब्द इंग्रजी शब्दकोशात प्रथम 1615 साली नोंदवला गेला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT