गोम्बे, टांझानिया : प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ जेन गुडॉल यांनी चिंपांझींच्या वर्तनावर महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. त्यांचे आणि चिंपांझीमधील भावनिक बंध दर्शवणारे 1964 मधील एक ऐतिहासिक छायाचित्र आजही मानवाचा प्राण्यांकडे पाहण्याचा द़ृष्टिकोन कसा बदलत गेला हे सांगणारे आयकॉनिक छायाचित्र ठरले आहे. 14 जुलै 1960 रोजी, 26 वर्षीय जेन गुडॉल टांझानियातील टांगानिका सरोवराच्या किनार्यावर पोहोचल्या.
या ठिकाणी, जो आता गोम्बे स्ट्रीम राष्ट्रीय उद्यान आहे, त्यांनी चिंपांझींच्या वर्तनावर आपले महत्त्वपूर्ण वैज्ञानिक संशोधन सुरू केले. जेन गुडॉल यांनी कोणतेही वैज्ञानिक पदवी नसताना मोकळ्या मनाने जंगली चिंपांझींचे निरीक्षण केले. त्या काळात प्रचलित असलेल्या नियमांचे उल्लंघन करून त्यांनी चिंपांझींना अंकाऐवजी ‘नावे’ दिली. चिंपांझी गवताची पाती काढून मुंग्यांच्या वारुळात खुपसून त्यावरील मुंग्या खातात, हे निरीक्षण करणारी जेन गुडॉल ही पहिली व्यक्ती होती. यापूर्वी, असे मानले जात होते की फक्त माणूसच हत्यारे वापरू शकतो.
1962 मध्ये जेन गुडॉल यांचे पती, डच छायाचित्रकार ह्यूगो व्हॅन लॉविक हे गोम्बे येथे पोहोचले. त्यांनी जेन गुडॉलचे हजारो फोटो काढले, पण 1964 मध्ये काढलेला एक फोटो ‘आयकॉनिक’ ठरला. या फोटोमध्ये जेन गुडॉल खाली वाकून आपला उजवा हात चिंपांझीच्या पिल्लाकडे (ज्याचे नाव फ्लिटं होते) पुढे करताना दिसत आहेत, तर फ्लिटं आपला डावा हात त्यांच्या दिशेने नेत आहे. 2013 मध्ये बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत गुडॉल यांनी सांगितले होते की, जेव्हा त्यांनी हा फोटो पाहिला, तेव्हा त्यांना मायकल एन्जोलोच्या ‘देवाने मानवापर्यंत पोहोचणे’ या प्रसिद्ध चित्राची आठवण झाली.
हा फोटो सर्वप्रथम डिसेंबर 1965 मध्ये ‘नॅशनल जिओग्राफिक’ मासिकात प्रकाशित झाला. या फोटोने आणि व्हॅन लॉविक यांच्या माहितीपटामुळे ‘माणूस हेच केवळ व्यक्तिमत्त्व, मन आणि भावना असलेले प्राणी आहेत’ या वैज्ञानिक संकल्पनेला आव्हान दिले. जेन गुडॉल यांच्या मते, या फोटोमुळे प्राणी कोण आहेत हे समजून घेण्याचा एक नवीन मार्ग उघडला गेला आणि हे सिद्ध झाले की मानव प्राणी सृष्टीचा एक भाग आहे, त्यापासून वेगळा नाही. या छायाचित्राने वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात महिलांच्या द़ृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित केले.