Hiroshima Survivor Diary | हिरोशिमा अणुबॉम्ब हल्ल्यातील वाचलेल्या व्यक्तीची गहाळ रोजनिशी 80 वर्षांनंतर सापडली 
विश्वसंचार

Hiroshima Survivor Diary | हिरोशिमा अणुबॉम्ब हल्ल्यातील वाचलेल्या व्यक्तीची गहाळ रोजनिशी 80 वर्षांनंतर सापडली

पुढारी वृत्तसेवा

टोकियो : दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर टाकलेल्या अणुबॉम्बच्या संहाराचा थरार स्वतः अनुभवणाऱ्या एका व्यक्तीची दैनंदिनी तब्बल ८० वर्षांनंतर अमेरिकेतील एका ग्रंथालयात सापडली आहे. कियोशी तानिमोटो या तेव्हा वाचलेल्या व्यक्तीने लिहिलेले हे २३० पानांचे हस्तलिखित आता एका पुस्तकाच्या रूपात प्रकाशित होणार असून, त्यावर आधारित एक भव्य चित्रपटही निर्माण केला जाणार आहे.

८ वाजून १५ मिनिटांचा तो काळजाचा ठोका चुकवणारा क्षण

६ ऑगस्ट १९४५ रोजी सकाळी ठीक ८.१५ वाजता जेव्हा ‘लिटल बॉय’ नावाचा अणुबॉम्ब हिरोशिमावर पडला आणि काही सेकंदांत ६०,००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला, तेव्हा कियोशी तानिमोटो शहरापासून दोन मैल अंतरावर होते. या हल्ल्यातून ते सुदैवाने वाचले; पण त्यानंतर त्यांनी शहरात जे पाहिले ते अत्यंत भयानक होते. त्यांनी १९४७ मध्ये इंग्रजीत लिहिलेल्या या डायरीत त्या भीषणतेचे अंगावर काटा आणणारे वर्णन केले आहे. ‘‘लोकांच्या चेहऱ्याची, हातांची आणि छातीची त्वचा सोलून निघाली होती आणि लोंबकळत होती. लोक चेहऱ्यावर कोणतेही भाव नसताना, शांतपणे एकामागून एक चालत होते... जणू भुतांचीच ती एक दिंडी होती.’’

येल युनिव्हर्सिटीत लागला शोध

प्रसिद्ध पत्रकार जॉन हर्सी यांनी १९४६ मध्ये ‘न्यू यॉर्कर’ मासिकात हिरोशिमावर एक प्रसिद्ध लेख लिहिला होता, त्‍यामध्‍ये तानिमोटो यांच्या संघर्षाचा समावेश होता. हर्सी यांच्या निधनानंतर त्यांची कागदपत्रे येल युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीत जतन करून ठेवण्यात आली होती. हर्सी यांच्या नातवाने (कॅनन हर्सी) या संग्रहातून तानिमोटो यांची ही गहाळ डायरी शोधून काढली. आता ही डायरी ऑगस्ट २०२६ मध्ये 'Hiroshima, 8:15 : The Lost Memoir' या नावाने पेंग्विन आणि रँडम हाऊसद्वारे जगभर प्रकाशित केली जाईल. या पुस्तकात तानिमोटो यांच्या ८१ वर्षीय कन्या कोको तानिमोटो कोंडो हिची ९,००० शब्दांची प्रस्तावना असेल. कोको या हल्ल्याच्या वेळी अवघ्या ८ महिन्यांच्या होत्या. या हस्तलिखितावर आधारित चित्रपटाचे चित्रीकरण नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे.

तानिमोटो यांनी दशकांपूर्वी पत्रकार हर्सी यांना म्हटले होते की, ‘‘जर तुम्ही ही कथा जगाला सांगू शकला नाही, तर आम्ही दुसऱ्यांदा मरणार आहोत.’’ हा शोध म्हणजे त्या मृत आत्म्यांना आणि वाचलेल्यांच्या संघर्षाला मिळालेले नवीन जीवन आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT