Hippopotamus Death | प्रेक्षकाची टोपी पोटात अडकल्याने पाणघोड्याचा मृत्यू  
विश्वसंचार

Hippopotamus Death | प्रेक्षकाची टोपी पोटात अडकल्याने पाणघोड्याचा मृत्यू

सिनसिनाटी प्राणिसंग्रहालयातील उपचारांना अपयश

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेतील सर्वांची लाडकी मादी पाणघोडा ‘फिओना’हिचा सिनसिनाटी प्राणिसंग्रहालयात मृत्यू झाला आहे. तिने गिळलेली टोपी पचवून शरीराबाहेर पडण्यासाठी प्राणिसंग्रहालयातील पशुवैद्यकीय पथकाने अनेक दिवस शर्थीचे प्रयत्न केले, मात्र अखेर तिची प्राणज्योत मालवली.

‘‘अत्यंत दुःखाने आम्ही ही हृदयद्रावक बातमी देत आहोत की, वैद्यकीय आणीबाणीच्या या परिस्थितीतून फिओनाला बाहेर काढण्यासाठी आमच्या पशुवैद्यक आणि देखभाल पथकाने अनेक प्रयत्न करूनही ती वाचू शकली नाही,’’ असे प्राणिसंग्रहालयाने गुरुवारी दुपारी जाहीर केले. ‘‘गेल्या आठवड्यात अपघाताने तिच्या अधिवासात पडलेली एका प्रेक्षकाची विणलेली टोपी तिने गिळल्यानंतर पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तिला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. तिच्या शरीरातून ही टोपी बाहेर काढण्यासाठी अनेकदा प्रयत्न करूनही अखेर तिला ते सहन झाले नाही.’’ तिचे प्राण वाचवण्यासाठी आवश्यक ती सर्व पूरक वैद्यकीय मदत देण्यात आली होती, मात्र हे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत, असे प्राणिसंग्रहालयाने म्हटले आहे.

या धक्क्याने सर्वांनाच मोठे दुःख झाले असून, या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी फिओनाचे चाहते आणि नागरिकांनी तिच्या देखभालकर्त्यांना आणि पशुवैद्यकांना आपल्या प्रार्थनेत ठेवावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. २०१७ मध्ये झालेल्या जन्मानंतर फिओनाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले होते. सुमारे ११ दिवसांपूर्वी प्राणिसंग्रहालयात आलेल्या एका प्रेक्षकाने विणलेली टोपी हवेत उडवली होती. छतावरील पंख्याच्या वाऱ्याने ही टोपी उडून प्रेक्षक गॅलरीच्या खिडक्यांवरील एका लहान फटीतून थेट फिओनाच्या अधिवासात जाऊन पडली आणि तिने ती गिळली. हा पूर्णपणे एक अपघात होता, असे प्राणिसंग्रहालयाच्या प्रवक्त्या मिशेल कर्ली यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT