जकार्ता : इंडोनेशिया हा मुस्लिम देश असला, तरी तेथील बाली बेटावर बहुसंख्य हिंदू आहेत. हे मूळचे इंडोनेशियाचेच नागरिक असून, ते भारतातून स्थलांतरित झालेले लोक नव्हेत. याच बाली बेटावर वसलेलं पेंगलीपुरण गाव प्रसिद्ध आहे. हे गाव हिंदूंचे ‘जगातील सर्वात स्वच्छ गाव’ म्हणूनही ओळखलं जातं. हे गाव जगातील तीन सर्वात स्वच्छ गावांपैकी एक आहे. पेंगलीपुरण गाव बालीच्या बांगली जिल्ह्यात आहे. डोंगरांमध्ये वसलेले हे गाव त्याच्या स्वच्छ रस्त्यांसाठी, सुंदर बागा, हिरवळीसाठी तसेच त्याच्या पारंपरिक घरांसाठी प्रसिद्ध आहे.
पेंगलीपुरण गावाचे सौंदर्य आणि स्वच्छता ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. येथे कचरा टाकण्यास सक्त मनाई आहे आणि फक्त नियुक्त केलेल्या ठिकाणीच धूम्रपान करण्यास परवानगी आहे. मद्यपान करण्यास देखील सक्त मनाई आहे. या गावातील जवळजवळ सर्व घरे पारंपरिक बांबू वापरून बांधली जातात. या गावातील महिला गावाच्या स्वच्छतेतदेखील महत्त्वाची भूमिका बजावतात. दर महिन्याला महिला गावातील सर्व कचरा गोळा करतात.
त्यानंतर सेंद्रिय कचरा कंपोस्टमध्ये रूपांतरित केला जातो, तर प्लास्टिक आणि इतर जैवविघटनशील कचरा पुनर्वापरासाठी पाठवला जातो. इंडोनेशियामध्ये असलं तरीदेखील पेंगलीपुरण हे गाव 100 टक्के हिंदू आहे. शिवाय, या गावात अनेक मंदिरं देखील आहे. प्रत्येक घरात एक वेगळे कुटुंब मंदिरदेखील आहे. हे गाव अंदाजे 700 वर्षे जुने आहे. ते इतके जुने असूनही, तिथे अद्यापपर्यंत एकही गुन्हा नोंदवला गेलेला नाही. या गावातील घरेदेखील एका विशिष्ट रांगेत बांधलेली आहेत. या गावात कोणत्याही प्रकारच्या वाहनांनादेखील परवानगी नाही.