नैरोबीः जगातील आधुनिक संस्कृतीपासून दूर, आफ्रिकेतील नामीबिया देशामध्ये ‘हिंबा’ नावाची एक अत्यंत प्रसिद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण आदिवासी जमात राहते. निसर्गाशी घट्ट नाते जपणाऱ्या या जमातीतील महिलांच्या सौंदर्याची आणि जीवनशैलीची जगभरात नेहमीच चर्चा असते. या महिला आपल्या संपूर्ण शरीरावर आणि केसांवर तांबड्या रंगाची खास माती लावतात.
हिंबा जमातीच्या महिलांच्या लालसर/तांबड्या रंगाच्या त्वचेमागे एक मोठे व्यावहारिक आणि पारंपरिक कारण आहे. या महिला दररोज सकाळी ‘ओट्जिझ’ नावाचा एक विशेष लेप तयार करतात. स्थानिक डोंगरांमधून मिळणारी तांबडी माती कुटून तिची बारीक पावडर केली जाते. ही पावडर तूप आणि सुगंधी वनस्पतींच्या रसासोबत एकत्र कालवून हा घट्ट लेप तयार होतो. नामीबियामध्ये प्रचंड उष्णता आणि कडक ऊन असते. हा तांबडा लेप त्यांच्या त्वचेसाठी नैसर्गिक ‘सनस्क्रीन’चे काम करतो आणि कडक उन्हापासून त्वचेचे संरक्षण करतो. हा लेप लावल्यामुळे डास आणि इतर विषारी कीटक शरीराला चावत नाहीत.
हिंबा जमात राहत असलेल्या अत्यंत रखरखीत आणि वाळवंटी प्रदेशात पाण्याची भीषण टंचाई असते. त्यामुळे येथील महिला कधीही पाण्याने आंघोळ करत नाहीत. हा तांबड्या मातीचा लेपच त्यांच्या शरीराची स्वच्छता राखण्यास मदत करतो. पाण्याची बचत करण्यासाठी या महिला एका खास धुराची आंघोळ (Smoke Bath) घेतात. सुगंधी वनस्पती आणि लाकडे पेटवून त्याच्या धुरासमोर त्या बसतात, ज्यामुळे शरीराला येणारा घाम आणि दुर्गंधी निघून जाते. याशिवाय, हिंबा महिलांच्या केसांची रचनादेखील अतिशय आकर्षक असते. त्या आपल्या केसांनाही तांबडी माती आणि शेळ्यांच्या केसांचा वापर करून सुंदर जटांसारख्या वेण्या घालतात. वैवाहिक स्थितीनुसार (अविवाहित, विवाहित किंवा आई) त्यांच्या केसांची रचना बदलत जाते.