Antarctica | अंटार्क्टिकाच्या वितळणार्‍या बर्फाखाली सोने, चांदी, प्लॅटिनमचा छुपा खजिना 
विश्वसंचार

Antarctica | अंटार्क्टिकाच्या वितळणार्‍या बर्फाखाली सोने, चांदी, प्लॅटिनमचा छुपा खजिना

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : जागतिक तापमान वाढीमुळे अंटार्क्टिका खंडावरील बर्फाचा थर वेगाने वितळत आहे. एका नवीन अभ्यासानुसार, इसवी सन 2300 पर्यंत अंटार्क्टिकातील इतका मोठा भूभाग बर्फमुक्त होईल, ज्याचा आकार अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्याएवढा असेल. या बदलामुळे केवळ अंटार्क्टिकाचा भूगोलच नाही, तर तेथील साधनसंपत्तीवरून जागतिक भू-राजकारणदेखील मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे या ठिकाणी जमिनीत सोने, चांदी, प्लॅटिनम यासारख्या मौल्यवान धातूंची खनिजे मोठ्या प्रमाणात आहेत.

‘नेचर क्लायमेट चेंज’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालेला हा अभ्यास ‘ग्लेशियल आयसोस्टॅटिक अ‍ॅडजस्टमेंट’ या संकल्पनेवर आधारित आहे. जेव्हा जड बर्फाचा थर वितळतो, तेव्हा त्याखालील दबलेली जमीन हळूहळू वर येते. कॅलिफोर्निया विद्यापीठातील भूभौतिकशास्त्रज्ञ आणि या अभ्यासाच्या मुख्य लेखिका एरिका लुकास यांनी हे स्पष्ट केले की, उघड पडणार्‍या या जमिनीमुळे आंतरराष्ट्रीय करारांमध्ये बदल करण्याची वेळ येऊ शकते. अंटार्क्टिकाच्या बर्फाखाली डोंगर, दर्‍या आणि ज्वालामुखींचे मोठे जाळे आहे. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, 2300 पर्यंत बर्फमुक्त होणार्‍या या भागात मौल्यवान खनिजांचे साठे असू शकतात. यामध्ये प्रामुख्याने पुढील खनिजांचा समावेश आहे : तांबे, सोने, चांदी, लोखंड आणि प्लॅटिनम. यातील अनेक खनिजे आधुनिक उत्पादन क्षेत्रात ‘महत्त्वाची खनिजे’ म्हणून ओळखली जातात. संशोधनानुसार, जमिनीचा सर्वाधिक भाग अर्जेंटिना, चिली आणि युनायटेड किंगडम यांनी दावा केलेल्या क्षेत्रात उघड होण्याची शक्यता आहे. या देशांनी आधीच अंटार्क्टिकातील काही भागांवर आपला हक्क सांगितला आहे. उघड पडणार्‍या जमिनीतील खनिज साठ्यांमुळे या देशांमधील रस वाढू शकतो, ज्यामुळे सध्याच्या अंटार्क्टिक करारांना आव्हान मिळू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT