लंडन : शरीरातील ‘दिसत नसलेली चरबी’ (व्हिसरल फॅट), जी अवयवांच्या भोवती जमा होते, ती हृदयाच्या वेगाने वृद्धत्वाशी संबंधित असल्याचे एका नवीन अभ्यासात समोर आले आहे. यूके बायोबँकेमधील 21,000 हून अधिक लोकांच्या माहितीचा वापर करून, वैज्ञानिकांनी सांगितले की, ही अदृश्य पोटाची चरबी हृदयातील ताठरता आणि सूज वाढवते. याउलट, महिलांच्या नितंब आणि मांड्यांभोवती जमा होणारी चरबी ( सबक्यूटेनिअस फॅट ) हृदयाचे संरक्षण करू शकते.
व्हिसरल फॅट ही पोटाच्या आत, यकृत, आतडे आणि स्वादुपिंडासारख्या अवयवांच्या भोवती जमा होणारी चरबी आहे. ही चरबी बाहेरून दिसत नाही आणि काही लोक निरोगी वजन असूनही त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात व्हिसरल फॅट असू शकते. याउलट, सबक्यूटेनिअस फॅट त्वचेखाली जमा होते, जी आपण हाताने पकडू शकतो.
मेडिकल रिसर्च कौन्सिल (चठउ) लॅबोरेटरी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या वैज्ञानिकांनी केलेल्या या अभ्यासात असे दिसून आले की, ज्या लोकांच्या शरीरात व्हिसरल फॅट जास्त असते, त्यांच्या हृदयाचे वय त्यांच्या प्रत्यक्ष वयापेक्षा जास्त होते. रक्त तपासणीत असे आढळले की व्हिसरल फॅट शरीरातील सूज वाढवते, ज्यामुळे अकाली वृद्धत्व येऊ शकते. पुरुषांमध्ये पोटाभोवती जमा होणारी सफरचंदाच्या आकाराची चरबी हृदयाच्या लवकर वृद्धत्वाशी संबंधित असल्याचे आढळले.
याउलट, महिलांमध्ये नितंब आणि मांड्यांवर जमा होणारी चरबी हृदयाचे संरक्षण करते. संशोधकांनी असेही सुचवले की, स्त्रियांमध्ये आढळणारे इस्ट्रोजेन हार्मोन हृदयाच्या वृद्धत्वाला थांबविण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. या संशोधनाचे प्रमुख प्रा. डेक्लान ओरेगन म्हणाले की, केवळ बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) हृदयाच्या वयाचा अंदाज घेण्यासाठी पुरेसा नाही. शरीरात चरबी कुठे साठवली आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.