जकार्ता : जगभरात माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या देहावर अंत्यसंस्कार करण्याची परंपरा प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळी आहे. पण काही आगळ्या-वेगळ्या परंपरा अशा आहेत, ज्या तुम्हाला आश्चर्यचकित करतात. इंडोनेशियामध्ये एक असा भाग आहे, तिथे लहान मुलांचा मृत्यू झाल्यास त्याचे शरीर हे जमिनीत नाही तर चक्क झाडात पुरतात. ऐकताना हे खूप भयानक वाटतंय. परंतु स्थानिक लोकांसाठी हे निसर्ग आणि आत्म्याशी जोडल्याचे प्रतीक आहे.
इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा मुस्लिमबहुल देश आहे. तेथील दक्षिण सुलावेसी प्रांतातील तोराजा जमात त्यांच्या अनोख्या अंत्यसंस्कार परंपरांसाठी ओळखली जाते. या परंपरा धर्मापेक्षा स्थानिक श्रद्धा आणि निसर्गाशी संबंधित श्रद्धांवर आधारित आहेत. तोराजा जमातीत जर कोणत्या लहान मुलाचा मृत्यू हा दात येण्याच्या आधीच झाला तर त्याला जमिनीत पुरले जात नाही तर गावातील लोक एका मोठ्या झाडाच्या बुंध्यात एक मोठे छिद्र काढून त्यात मुलाचे शरीर पुरतात. त्यानंतर ते छिद्र खजुरीच्या झाडांपासून बनवलेल्या फायबरने बंद केले जाते. कालांतराने झाड वाढते आणि हे छिद्र स्वतःच भरून जाते.
स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, दात न आलेल्या कोवळ्या बाळांचा जीवात्मा हा खूप पवित्र असतो. झाडात त्याच्या शरीराला पुरल्यामुळे हवा आणि निसर्ग या आत्म्याला आपल्यात विसावते. त्यांच्या श्रद्धेनुसार या प्रक्रियेमुळे मुलाचा आत्मा थेट निसर्गात विलीन होतो. म्हणून तो मृत्यू मानला जात नाही तर जीवनाच्या नवीन स्वरूपात परत येणे मानले जाते. तोराजा जमातीत वयस्कर आणि युवकांवर अंतिम संस्कार करण्याची प्रक्रिया वेगवेगळी असते.
जर कोणत्या वयस्कर व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यांच्या पूर्वजांचे शव कबमधून बाहेर काढले जाते. त्यांना नवीन कपडे घातले जातात आणि पूर्ण गावात फिरवले जाते. त्यानंतरच नव्या मृत व्यक्तीला तिथे पुरले जाते. ही परंपरा मृत आणि जीवितांच्यामध्ये संबंध बनवण्याचे प्रतीक आहे. तोराजा जमातीतील ही परंपरा जगभरातील लोकांसाठी कुतूहलाचा विषय बनली आहे. या विधींचे साक्षीदार होण्यासाठी असंख्य पर्यटक तोराजा प्रदेशाला भेट देतात. स्थानिक प्रशासन आणि समुदाय हे सुनिश्चित करतात की, या परंपरा केवळ भावना म्हणून नव्हे तर आदराने पाळल्या जातील.