वेलिंग्टन : जगात सर्वात वजनदार कीटक कोणता आहे, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? या प्रश्नाचे उत्तर नुकतेच समोर आले आहे. या कीटकाचे वजन चक्क तीन सामान्य उंदरांपेक्षा जास्त आहे! ‘वेटा’ नावाच्या या महाकाय कीटकाने (Giant Weta) जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. याला कीटकांच्या जगातील ‘हेवीवेट चॅम्पियन’ म्हटले जात आहे. 71 ग्रॅम वजनाच्या या प्रचंड कीटकाने पृथ्वीवरील सर्वात वजनदार कीटकाचा किताब मिळवला आहे.
हा महाकाय वेटा उंदरापेक्षा तिप्पट जड असून त्याचा आवडता आहार म्हणजे गाजर आहे. एका व्हायरल झालेल्या छायाचित्रात, हा विशाल वेटा गाजर खाताना दिसत आहे. एका सोशल मीडिया अकाउंटवर ‘जायंट वेटा’चा गाजर खातानाचा हा लक्षवेधी फोटो शेअर करण्यात आला आहे, जो खूप व्हायरल होत आहे. या फोटोचे श्रेय छायाचित्रकार मार्क मोफेट यांना दिले जाते. ही पोस्ट शेअर करताना यूजरने लिहिले, ‘जायंट वेटा हा जगातील सर्वात जड कीटक आहे, त्याचे वजन 71 ग्रॅम आहे, जे उंदरापेक्षा तिप्पट जास्त आहे. हा गाजर खातो.
त्याचे छायाचित्र मार्क मोफेट यांनी घेतले आहे.’ या पोस्टला आतापर्यंत 2 लाख 67 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 1.6 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा कीटक न्यूझीलंडमध्ये आढळतो. तो 17.5 सेंटीमीटर (7 इंच) लांब असू शकतो. एका सामान्य उंदरापेक्षा तो तिप्पट जड आणि अगदी चिमणीपेक्षाही जास्त वजनाचा आहे. ‘वेटा’ हे नाव माओरी शब्दावरून आले आहे, ज्याचा अर्थ आहे ‘कुरूप वस्तूंचा देव’ हा एक शाकाहारी जीव असून तो ताजी पाने खातो, मात्र कधीकधी तो लहान कीटकही खातो. उंदीर आणि मांजर यांसारख्या प्राण्यांच्या शिकारीमुळे या विशाल कीटकाची संख्या सातत्याने कमी होत आहे आणि तो विलुप्त होण्याच्या धोक्याचा सामना करत आहे.