न्यूयॉर्क ः जगभरात होणार्या मृत्यूंमागे हृदयविकाराचे कारण सर्वात मोठे आहे असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. लोकांच्या मृत्यूंसाठी कारणीभूत असलेल्या दहा प्रमुख घटकांमध्ये सात असंसर्गजन्य रोगांचा समावेश आहे. या दहा आजारांमध्ये मधुमेह आणि डिमेन्शियाचाही समावेश आहे.
वैश्विक स्तरावर गेल्या वीस वर्षांपासून हृदयरोग हा मृत्यूचे सर्वात मोठे कारण बनला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार हृदयरोगामुळे पूर्वीपेक्षा सध्या अधिक मृत्यू होत आहेत. विशेष म्हणजे संघटनेने प्रसिद्ध केलेल्या दहा रोगांच्या यादीत क्षयरोग म्हणजेच टीबीचा समावेश नाही. 2000 साली हा रोग यादीत सातव्या स्थानावर होता. 2019 मध्ये तो तेराव्या स्थानावर गेला. टीबीविरुद्धच्या लढाईला आता यश येत असल्याचेच हे चिन्ह आहे. एचआयव्ही आणि मलेरियामुळे होणारे मृत्यूही कमी झाले आहेत. लोकांचे आयुर्मानही वाढत असल्याचे दिसून आले आहे. सन 2000 च्या तुलनेत 2019 मध्ये लोकांच्या आयुर्मानात सहा वर्षांची वाढ झाली आहे. सन 2000 मध्ये वैश्विक सरासरी आयुष्य 67 वर्षांचे होते तर 2019 मध्ये लोकांचे आयुर्मान 73 वर्षांचे झाले आहे. अर्थात सरासरी पाच लोकच या अतिरिक्त वर्षांमध्ये निरोगी आयुष्य जगतात असेही दिसले आहे. मृत्यूंमागे 16 टक्के कारण हृदयरोगाचेच आहे. हृदयविकारामुळे होणार्या मृत्यूंची संख्या सन 2000 नंतर वीस लाखांनी वाढून 2019 मध्ये सुमारे 90 लाख झाली आहे.