टोकियो : टोकियोमध्ये झालेल्या 2025 च्या डेफलिंपिक्स स्पर्धांनी क्रीडा अनुभवाचा अर्थच बदलून टाकला आहे. पारंपरिक क्रीडा वातावरणात आवाजाला मोठे महत्त्व असते चेंडूचा आवाज, शिट्टी, प्रेक्षकांचा जल्लोष. पण या स्पर्धांमध्ये ‘आवाज’ ऐकण्यापुरता मर्यादित न राहता तो पाहता, जाणवता आणि अगदी हातात धरता येईल अशा स्वरूपात सादर करण्यात आला.
शंभर वर्षांहून अधिक इतिहास असलेल्या डेफलिंपिक्स या स्पर्धा कर्णबधिर खेळाडूंसाठी सर्वोच्च व्यासपीठ मानल्या जातात. मात्र टोकियोत या स्पर्धा केवळ खेळापुरत्या न राहता समावेशक तंत्रज्ञानाच्या प्रयोगशाळा ठरल्या. अभियंते, डिझायनर्स आणि कर्णबधिर वापरकर्ते एकत्र येऊन ‘आवाजाचा अनुभव’ नव्याने परिभाषित केला.
टेबल टेनिस मैदानात प्रेक्षकांसाठी एक अनोखा प्रयोग पाहायला मिळाला. कोर्टच्या वर मोठ्या स्क्रीनवर जपानी शैलीतील ऑनोमॅटोपीक (ध्वनीचे द़ृश्य शब्द) अॅनिमेशन दाखवण्यात आले. प्रत्येक फटका, चेंडूचा वेग आणि स्मॅश हे सर्व ठळक अक्षरांमधून द़ृश्यरूपात मांडले गेले.
जपानी संस्कृतीत कॉमिक्स आणि माध्यमांमध्ये ध्वनीचे द़ृश्य रूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते. त्याच संकल्पनेचा वापर येथे सुलभतेसाठी करण्यात आला. यामुळे नवीन प्रेक्षक किंवा बहिरे चाहत्यांना खेळाचा वेग, महत्त्वाचे क्षण आणि सामन्यातील बदल सहज समजतात.
टोकियोतील 19 ठिकाणी आयोजित स्पर्धांदरम्यान शहरच एक प्रयोगशाळा बनले. मेट्रो स्थानकांवर पारदर्शक स्क्रीन बसवण्यात आल्या, ज्या आवाजाचे त्वरित मजकुरात रूपांतर करतात. त्यामुळे प्रवास करताना संवाद अधिक सुलभ झाला. तसेच तंत्रज्ञान कंपनी फिजित्सुने विकसित केलेल्या एआय प्रणालीने रेल्वे घोषणा, सायरन आणि इतर आवाज ओळखून त्यांना मजकूर आणि सांकेतिक भाषेत रूपांतरित केले. या प्रणालीतही काही ध्वनी द़ृश्य चिन्हांद्वारे दाखवले गेले, ज्यामुळे केवळ माहितीच नव्हे तर त्या क्षणाची तीव्रताही समजते.
स्पर्धांमध्ये प्रेक्षकांसाठी कंपन देणारी उपकरणे वापरण्यात आली. मॅटवरील हालचाली, पायांची धावपळ किंवा फेक हे सर्व सेन्सर्सद्वारे टिपून प्रेक्षकांच्या उपकरणांपर्यंत कंपन स्वरूपात पोहोचवले गेले. हलक्या हालचालींना सौम्य कंपन, तर जोरदार फेकीला तीव्र कंपन जाणवत होती.
या नव्या तंत्रज्ञानामुळे क्रीडा अनुभव अधिक समावेशक बनत आहे. ‘आवाज’ हा आता केवळ ऐकण्याचा विषय राहिला नाही, तर तो पाहता आणि जाणवता येणारा अनुभव बनला आहे. टोकियो डेफलिंपिक्सने दाखवून दिले की, योग्य तंत्रज्ञान आणि सहभागामुळे क्रीडा प्रत्येकासाठी समानपणे रोमांचक बनू शकते.