हृदयाच्या आरोग्यासाठी ‘हा’ आहार ठरतो उपयुक्त 
विश्वसंचार

Heart Health : हृदयाच्या आरोग्यासाठी ‘हा’ आहार ठरतो उपयुक्त; जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचा सल्ला

जागतिक हृदय दिनानिमित्त जाणून घ्या योग्य आहाराची सूची

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्‍ली : जगभरात मंगळवारी ‘जागतिक हृदय दिन’ साजरा करण्यात आला; मात्र हृदयासाठी पोषक आहाराची जगातील किती लोकांना माहिती आहे? आपण काय खातो, याचा थेट परिणाम आपल्या हृदयाच्या आरोग्यावर होत असतो. पौष्टिक अन्‍न खाणे म्हणजे खूप कठीण किंवा कडक पथ्ये पाळणे असा होत नाही; तर एक संतुलित आहार तयार करणे आणि तो रोजच्या दिनचर्येत नियमितपणे पाळणे हा त्यामागचा खरा उद्देश आहे, असे तज्ज्ञ सांगतात. हृदयासाठी कोणता आहार उपयुक्त ठरतो हे जाणून घेऊया...

हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायबर, अँटीऑक्सिडंटस्, पोटॅशियम आणि हेल्दी फॅट्सयुक्त पदार्थांचा आपल्या जीवनशैलीत समावेश करणे आवश्यक आहे. फळे आणि भाज्या हा आपल्या आहाराचा मुख्य भाग असावा. पालक आणि मेथीसारख्या हिरव्या पालेभाज्यांसोबतच टोमॅटो, गाजर, बीन्स, ब्रोकोली, पेरू, संत्री, सफरचंद आणि इतर हंगामी फळे फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि वनस्पतींपासून मिळणारे विविध पोषक घटक पुरवतात. फळांचा ज्यूस पिण्यापेक्षा अख्खे फळ खाणे अधिक फायदेशीर ठरते; कारण त्यात मुबलक फायबर असते आणि त्यामुळे पोटही दीर्घकाळ भरलेले राहते.

फळे आणि भाज्यांव्यतिरिक्त आहारातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे अखंड धान्ये. रिफाइंड धान्यांच्या तुलनेत यामध्ये अधिक फायबर असते. यासाठी ओटस्, बार्ली, गव्हाची पोळी, ब्राऊन राईस तसेच नाचणी, ज्वारी आणि बाजरी यांसारखी भरड धान्ये उत्तम पर्याय आहेत. याशिवाय डाळी, चणे, राजमा आणि चवळी यांसारख्या कडधान्यांमध्ये वनस्पतीजन्य प्रथिने आणि फायबरचे उत्तम मिश्रण असते. भारतीय पारंपरिक जेवणात यांचा सहज समावेश केला जाऊ शकतो. आहारात चांगल्या चरबीचा (Healthy Fats) समावेश करणे हृदयासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

बदाम आणि अक्रोड यांसारखे सुकामेवा तसेच जवस आणि चिया सीडस् यांसारख्या बियांमध्ये अनसॅच्युरेटेड फॅटस् व इतर पोषक घटक असतात. जे लोक मांसाहार करतात त्यांच्यासाठी सार्डिन, सॅल्मन आणि मॅकेरल या माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात असते, जे आहारासाठी उत्तम मानले जाते. प्रोसेस्ड फूड (प्रक्रिया केलेले अन्‍न), जास्त तळलेले पदार्थ, प्रोसेस्ड मीट, गोड पेये आणि सॅच्युरेटेड किंवा ट्रान्स फॅटयुक्त पदार्थांचे अतिसेवन हृदयाच्या आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम करते. अन्‍नात मिठाचा वापर जास्त केल्यास शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास उद्‍भवू शकतो. आहारात या गोष्टी टाळणेही महत्त्‍वाचेे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT