लंडन : प्लास्टिकचा सध्याचा वापर मानवी आरोग्यासाठी अत्यंत चिंताजनक वळणावर पोहोचला आहे. ‘द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका ताज्या अभ्यासानुसार, जर प्लास्टिकच्या वापरात तातडीने बदल केले नाहीत, तर 2040 पर्यंत मानवी आरोग्याला होणारा धोका आजच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो.
अभ्यासात असे दिसून आले आहे की, प्लास्टिक त्याच्या संपूर्ण जीवनचक्रात पर्यावरणात विष कालवते :
90 टक्के कच्चा माल : प्लास्टिकसाठी लागणारा 90 टक्के कच्चा माल (जीवाश्म इंधन) काढण्यापासूनच धोक्याला सुरुवात होते.
आरोग्यावरील परिणाम : 2024 पर्यंत या स्थितीत सुधारणा न झाल्यास कॅन्सर आणि असंसर्गजन्य रोगांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. जर सध्याची परिस्थिती अशीच राहिली, तर 2040 पर्यंत प्लास्टिकमुळे होणारे नुकसान पुढीलप्रमाणे विभागले जाईल : ग्लोबल वॉर्मिंग (40 टक्के योगदान) : प्लास्टिक निर्मितीमुळे निघणार्या ग्रीनहाऊस गॅसेसमुळे जागतिक तापमान वाढेल आणि त्याचे परिणाम आरोग्यावर होतील.
वायू प्रदूषण (32 टक्के योगदान) : प्लास्टिक निर्मितीच्या प्रक्रियेमुळे हवेचे प्रदूषण वाढेल.
विषारी रसायने (27 टक्के योगदान) : पर्यावरणात सोडल्या जाणार्या विषारी रसायनांचा मानवी शरीरावर परिणाम होईल.
इतर कारणे (1 टक्का) : ओझोन थराचा र्हास आणि रेडिएशनमुळे होणारे नुकसान. लंडन स्कूलच्या संशोधक मेगन डीनी यांनी सांगितले की, जर धोरणांमध्ये बदल झाला नाही, तर दरवर्षी होणारे आरोग्याचे नुकसान दुप्पट होईल. ‘2016 ते 2040 या कालावधीत जागतिक प्लास्टिक प्रणालीमुळे लोकांच्या निरोगी आयुष्याची एकूण 83 दशलक्ष (8.3 कोटी) वर्षे कमी होऊ शकतात,’ असा धक्कादायक निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला आहे. संशोधकांनी स्पष्ट केले आहे की, फक्त कचरा गोळा करणे किंवा रिसायकलिंग करणे पुरेसे नाही.
यावर उपाय काय?
प्लास्टिकचा अनावश्यक वापर पूर्णपणे बंद करणे आणि साहित्याचा पुनर्वापर करणे हाच एकमेव मार्ग आहे. सरकारने नवीन प्लास्टिकच्या उत्पादनावर कडक नियंत्रण आणणे आणि पर्यायी साहित्याला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. सर्वात जास्त नुकसान हे प्लास्टिकच्या निर्मितीच्या वेळी आणि ते उघड्यावर जाळल्यामुळे होते, ज्यामुळे घातक वायू थेट फुफ्फुसात जातात.