सुक्या अंजिराचे पाणी हे एक साधे पण गुणकारी आरोग्य पेय म्हणून लोकप्रिय होत आहे. रात्रभर पाण्यात अंजीर भिजवून तयार केलेले हे पेय तंतुमय घटक (फायबर), जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंटस्ने समृद्ध असून, आरोग्याला अनेक फायदे देते. पचनसंस्थेला आधार देणे, वजन नियंत्रित ठेवणे, रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राखणे किंवा हाडे मजबूत करणे अशा कोणत्याही उद्देशासाठी अंजिराचे पाणी हा आहारातील एक उत्तम पर्याय ठरू शकतो, असे आहार तज्ज्ञ सांगतात. रात्रभर एक ग्लास पाण्यात २-३ सुके अंजीर भिजत ठेवा आणि सकाळी उठल्याबरोबर सर्वप्रथम ते पाणी प्या. अतिरिक्त तंतुमय घटक (फायबर) आणि पोषक तत्त्वे मिळवण्यासाठी तुम्ही भिजवलेले अंजीरही खाऊ शकता, असे तज्ज्ञ सांगतात. अंजिराच्या पाण्याचे हे काही लाभ...
रक्तातील साखरेचे नियमन
अंजिराच्या पाण्यात विरघळणारे तंतुमय घटक (सोल्युबल फायबर) असतात, ज्यामुळे शर्करा शोषण्याची प्रक्रिया मंदावते आणि रक्तातील साखरेची पातळी एकदम वाढण्यास प्रतिबंध होतो. तज्ज्ञांच्या मते, मधुमेहाचे व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तींना याचा फायदा होऊ शकतो. मात्र, प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे आहे; कारण अतिसेवनामुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो.
पचनक्रिया सुधारण्यास उपयुक्त
अंजिरात तंतुमय घटक मुबलक प्रमाणात असतात, जे नैसर्गिक रेचक (लॅक्झेटिव्ह) म्हणून काम करू शकतात. अंजिराचे पाणी बद्धकोष्ठतेपासून आराम देते आणि पचन सुरळीत ठेवून आतड्यांचे आरोग्य सुधारते. अंजीर भिजवल्याने ते पचनसंस्थेसाठी अधिक सौम्य बनते; त्यामुळे पोट फुगणे किंवा अपचनाचा त्रास होणाऱ्यांसाठी हे पेय उत्तम ठरते.
हृदयस्वास्थ्यासाठी फायदेशीर
अंजिराचे पाणी हे पोटॅशियमचा एक चांगला स्रोत आहे; पोटॅशियम हे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करणारे खनिज आहे. याशिवाय अंजिरात ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी ॲसिडस् असतात, जे हृदयस्वास्थ्य जपण्यास आणि हृदयविकारांचा धोका कमी करण्यास पूरक ठरू शकतात.
वजन व्यवस्थापनात सहायक
वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर अंजिराच्या पाण्यातील तंतुमय घटकांमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते, अनावश्यक खाण्याची इच्छा आटोक्यात येते आणि निरोगी वजन व्यवस्थापनाला हातभार लागतो. संतुलित आहारात याचा समावेश केल्यास चयापचय (मेटाबॉलिझम) आणि भूक नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते.
हाडे मजबूत करते
अंजीर नैसर्गिकरीत्या कॅल्शियमने समृद्ध असते; कॅल्शियम हे हाडांचे आरोग्य आणि घनता टिकवण्यासाठी अत्यावश्यक खनिज आहे. अंजिराच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास हाडे मजबूत राहण्यास आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.