नवी दिल्ली : सध्या सगळीकडेच गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. थंडीच्या दिवसांत आहारात अनेक बदल केले जातात. या काळात शरीराला उबदार ठेवण्यासोबतच आवश्यक पोषण देणारे पदार्थ खाण्यावर भर दिला जातो. अशा पदार्थांमध्ये बाजरीचा समावेश होतो. बाजरीची भाकरी, लाडू किंवा खिचडी अशा वेगवेगळ्या प्रकारे बाजरी आहारात समाविष्ट करता येते. बाजरीमध्ये फायबर, लोह, मॅग्नेशियम, प्रथिने आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटस् यांसारखे पोषक घटक असतात. थंडीच्या दिवसांत नियमितपणे बाजरी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात, असे आहारतज्ज्ञ सांगतात.
बाजरीमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुरळीत राहण्यास मदत होते. तसेच पोट फुगणे, गॅस आणि ॲसिडिटी यांसारख्या समस्यांचा त्रास कमी करण्यासाठीही बाजरी उपयुक्त ठरू शकते. यामुळे आतड्यांची हालचाल नियमित राहण्यास मदत होते. बाजरीमध्ये लोह आणि मॅग्नेशियम यांसारखी खनिजे असतात. ही पोषक तत्त्वे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यास मदत करतात. हिवाळ्यात अनेकांना थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. अशा वेळी आहारात बाजरीचा समावेश केल्याने शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होऊ शकते.
बाजरीची प्रकृती उष्ण मानली जाते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत बाजरी खाण्याचा सल्ला दिला जातो. बाजरी शरीराला उबदार ठेवण्यास मदत करते. तसेच, शरीरातील चयापचय क्रिया अर्थात मेटाबॉलिझम सुधारण्यासही ती सहायक ठरू शकते. बाजरी हे रक्तातील साखरेची पातळी लक्षात घेऊन आहार निवडणाऱ्यांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. यामध्ये असलेल्या फायबरमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तीही डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने आहारात बाजरीचा समावेश करू शकतात. बाजरीमध्ये फायबरसह अनेक पोषक घटक असतात. हे घटक शरीराच्या एकूण आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत.
न्यूट्रिशनिस्टच्या मते, बाजरीतील पोषक घटक थायरॉईडशी संबंधित आरोग्य आणि शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत करू शकतात. बाजरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे ती खाल्ल्यानंतर पोट बराच वेळ भरलेले राहते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि अतिरिक्त खाणे टाळण्यास मदत होते. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींसाठी आहारात बाजरीचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. बाजरीमध्ये लोह, मॅग्नेशियम आणि झिंक यांसारखी पोषक तत्त्वे आढळतात. ही पोषक तत्त्वे शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यास मदत करतात. याशिवाय त्वचेच्या आरोग्यासाठीही बाजरीतील पोषक घटक उपयुक्त ठरू शकतात.