डॉ. भारत लुणावत
हायब्रीड वर्कआऊट म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि एंड्युरन्स ट्रेनिंग यांचा मिलाफ किंवा संयोग होय. केवळ स्नायू कमावणे किंवा केवळ वजन कमी करणे यापेक्षा शरीराची सर्वंकष कार्यक्षमता वाढवणे, हे या व्यायामाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
हायब्रीड वर्कआऊटच्या मुळाशी ‘कन्करंट ट्रेनिंग’ हे तत्त्व दडलेले आहे. जेव्हा एखादी व्यक्ती एकाच प्रशिक्षण कार्यक्रमात ताकद आणि धावणे किंवा पोहणे यांसारखे व्यायाम एकत्र करते, तेव्हा शरीरातील चयापचय प्रक्रिया अधिक वेगाने कार्य करते. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘आफ्टरबर्न इफेक्ट’. याला ‘एक्सेस पोस्ट-एक्सरसाईज ऑक्सिजन कन्झम्पशन’ असे म्हणतात. या प्रक्रियेमुळे व्यायाम संपल्यानंतरही शरीर कित्येक तास कॅलरी जाळण्याचे काम सुरू ठेवते. यामुळे चरबी कमी होण्यास आणि स्नायूंची घनता वाढण्यास एकाच वेळी मदत होते.
हायब्रीड वर्कआऊट हे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते. केवळ वजन उचलल्याने स्नायूंची ताकद वाढते, तर कार्डिओ व्यायामामुळे हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता सुधारते. जेव्हा हे दोन्ही व्यायाम एकत्र केले जातात, तेव्हा रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढते आणि रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, हायब्रीड ट्रेनिंगमुळे शरीरातील ‘मायट्रोकाँड्रियल’ कार्यक्षमता वाढते. पेशींमधील हे ऊर्जा केंद्र अधिक सक्षम झाल्यामुळे व्यक्तीला दिवसभर उत्साही वाटते आणि थकवा कमी जाणवतो.
हाडांच्या आरोग्यासाठीही हायब्रीड वर्कआऊट वरदान ठरत आहे. वाढत्या वयानुसार हाडांची घनता कमी होण्याचा धोका असतो, ज्याला ‘ऑस्टिओपोरोसिस’ म्हटले जाते. वजन उचलण्याच्या व्यायामामुळे हाडांवर विशिष्ट ताण निर्माण होतो, जो नवीन हाडांच्या पेशी तयार करण्यास चालना देतो. त्याच वेळी धावणे किंवा उड्या मारणे यांसारख्या व्यायामांमुळे शरीराचा समतोल आणि लवचिकता सुधारते. यामुळे उतारवयात पडल्यामुळे होणाऱ्या दुखापतींचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटते.
मानसिक आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास, अशा वैविध्यपूर्ण व्यायामामुळे मेंदूत ‘एंडोर्फिन’ आणि ‘डोपामाईन’ सारखी आनंदी संप्रेरके पाझरतात. यामुळे तणाव आणि नैराश्यापासून मुक्ती मिळते.
हायब्रीड वर्कआऊट सुरू करताना शरीराच्या मर्यादा ओळखून त्याचे नियोजन करणे आवश्यक असते. अतिव्यायाम टाळण्यासाठी आणि स्नायूंची झीज भरून काढण्यासाठी ‘रिकव्हरी’ला तितकेच महत्त्व दिले पाहिजे. योग्य प्रथिने आणि विश्रांती घेतल्यास हा व्यायाम प्रकार दीर्घकाळ टिकणारे परिणाम देतो.