Hawk Eating Chickens | कोंबड्या खाऊन इतका लठ्ठ झाला ससाणा की उडणेच विसरला! 
विश्वसंचार

Hawk Eating Chickens | कोंबड्या खाऊन इतका लठ्ठ झाला ससाणा की उडणेच विसरला!

वन्यजीव पथकाने ठेवले डाएटवर!

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातून एक अत्यंत रंजक आणि मजेशीर घटना समोर आली आहे. येथे एका ससाण्याने परिसरातील कोंबड्यांवर ताव मारत पोटपूजा अशी काही केली की, अतिरेकी खाण्यामुळे त्याचे वजन प्रमाणाबाहेर वाढले. त्याचे वजन इतके वाढले की हा शिकारी पक्षी हवेत झेप घेणे तर दूरच, साधे जमिनीवरून उडूही शकत नव्हता! अखेर वन्यजीव तज्ज्ञांना या लठ्ठ ससाण्याला पकडून सक्तीच्या 'डाएट'वर ठेवावे लागले आहे!

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून परिसरातील पाळीव व मोकाट कोंबड्या अचानक गायब होऊ लागल्या होत्या. या कोड्याचा उलगडा तेव्हा झाला जेव्हा एका नागरिकाच्या घराबाहेर असणाऱ्या ड्राइव्हवेवर एक ससाणा विनाकारण जमिनीवर बसलेला आढळला. तो उडण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचे शरीर साथ देत नव्हते. पक्षी उडू शकत नसल्याने नागरिकांनी तातडीने वन्यजीव बचाव पथकाला याची माहिती दिली. पथकाने घटनास्थळी पोहोचून पक्ष्याची वैद्यकीय तपासणी केली. सुरुवातीला हा पक्षी गंभीर आजारी किंवा जखमी असावा, असा अंदाज होता. मात्र, एक्स-रे आणि तपासणीनंतर जी माहिती समोर आली, ती थक्क करणारी होती.

हा ससाणा पूर्णपणे निरोगी आणि धडधाकट होता, तो आजारी किंवा जखमी नव्हता; तर तो केवळ 'जास्त खाऊन अतिलठ्ठ' झाला होता. त्याचे वजन दोन पाऊंडांपेक्षा जास्त झाले होते. ससाण्याने परिसरातील कोंबड्या फस्त करून आपले वजन इतके वाढवून घेतले होते की, गुरुत्वाकर्षणवर मात करून उडण्याची त्याची क्षमताच संपली होती. ससाण्याच्या या खादाडपणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. वन्यजीव तज्ज्ञांनी या अनोख्या समस्येवर उपाय म्हणून आता या पक्ष्याला विशेष देखरेखीखाली ठेवले असून, त्याचे वजन कमी करण्यासाठी त्याला कडक 'डाइट प्लान' दिला जात आहे. वजन नियंत्रणात आल्यावर त्याला पुन्हा नैसर्गिक वातावरणात सोडून दिले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT