लंडन : वाइकिंग युगातील धातुकामाचे एक अद्वितीय उदाहरण म्हणून ओळखली जाणारी एक लहानशी चांदीची मूर्ती डेन्मार्कमधील हॉरबी या गावात 2012 मध्ये शोधण्यात आली. ही मूर्ती नॉर्स युद्धदेव ओडिन याला सहाय्य करणार्या पौराणिक योद्धा कन्या वल्कीरीचे चित्रण करते. सध्या ही मूर्ती डेन्मार्कच्या नॅशनल म्युझियममध्ये ठेवलेली आहे.
ही सुमारे 1.3 इंच (3.4 सें.मी.) उंच व 0.4 औंस (13.4 ग्रॅम) वजनाची आहे. तिचे शरीर अंशतः पोकळ आहे व त्यावर सोन्याचा पातळ थर चढवण्यात आला आहे. सजावटीसाठी काळसर नियेलो नावाच्या धातू मिश्रधातूचा वापर करण्यात आला आहे. या स्त्री मूर्तीमध्ये तिचे केस मागे एक पोनीटेलमध्ये बांधलेले आहेत जे पाठीजवळ खाली झुकत आहेत. तिने व्ही गळ्याचा झगा घातला आहे, जो घेरदार स्कर्टमध्ये संपतो. तिच्या डाव्या हातात ढाल असून उजव्या हातात एक लहानसा दोन्ही बाजूंनी धार असलेला तलवार आहे. तिच्या पोशाखावर गुंफलेली गाठांची नक्षी मागच्या व बाजूच्या बाजूंनी कोरलेली आहे.
ही मूर्ती सशस्त्र स्त्रीची असल्याने ती वल्कीरीचे प्रतिनिधित्व करत असावी, असा अंदाज म्युझियम ओडन्सेचे पुरातत्त्वशास्त्रज्ञ मोगेन्स बो हेनरिक्सन आणि नॅशनल म्युझियम ऑफ डेनमार्कचे पीटर वँग पीटरसन यांनी त्यांच्या 2013 मधील Skalk या मासिकातील अभ्यासात मांडला आहे. वल्कीरी या युद्धात मृत्यू पावणार्या योद्ध्यांची निवड करत आणि त्यांना ओडिनच्या वॅल्हालामध्ये नेत, जिथे त्या योद्ध्यांना मद्य पुरवत राहत. हेच योद्धे नंतर रॅग्नारॉकच्या अंतिम युद्धात ओडिनच्या बाजूने राक्षसांशी लढण्यासाठी पुन्हा उठवले जात. या मूर्तीच्या सजावटीच्या शैलीवरून ती इ.स. 800 च्या आसपास, म्हणजेच वाइकिंग युगाच्या सुरुवातीस तयार करण्यात आली असावी.
या जागेवर अरब देशातील नाणी, चांदीचे बिस्किटे आणि दागिनेही सापडले, ज्यावरून तिथे वाइकिंग युगातील एखाद्या सरदाराचा शेत किंवा कार्यशाळा असावी, असा संशोधकांचा अंदाज आहे. डेन्मार्क आणि इंग्लंडमध्ये याआधी सशस्त्र महिला आकृती आढळल्या असल्या, तरी त्या बहुतेक वेळा दोन आयामांत असतात, पेंडंटस् किंवा ब-ुचेसच्या स्वरूपात; मात्र हॉरबी वल्कीरी ही अंशतः पोकळ असून ती कदाचित एखाद्या जादुई काठीच्या टोकावर सजवलेली असावी. वोल्वा (भविष्यवाणी करणार्या नॉर्स स्त्रिया) अशा प्रकारच्या काठ्या त्यांच्या विधीमध्ये वापरत असत, असं नॉर्स सागांमध्ये वर्णन आहे. शेतावर राहणार्या एखाद्या शक्तिशाली स्त्रीची ही खास वस्तू असावी, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.