Hand Numbness | हात सुन्न पडताहेत? 
विश्वसंचार

Hand Numbness | हात सुन्न पडताहेत?

पुढारी वृत्तसेवा

डॉ. संतोष काळे

हाताचा सुन्नपणा सतत टिकून राहत असेल, वस्तू धरताना हात थरथरत असेल किंवा मानेला कोणतीही दुखापत झाल्यानंतर हा त्रास सुरू झाला असेल, तर मज्जारोगतज्ज्ञांकडून तपासणी करून घेणे गरजेचे आहे. बहुतांश प्रकरणांमध्ये ही समस्या केवळ औषधोपचार, योग्य फिजिओथेरपी आणि दैनंदिन सवयींमधील बदलांद्वारे शस्त्रक्रियेविना पूर्णपणे बरी होऊ शकते.

सकाळी उठल्यावर अचानक हात बधीर झालेला असणे, तळहाताला मुंग्या येणे किंवा हात काही वेळासाठी सुन्न पडणे असा अनुभव अनेक व्यक्तींना आयुष्यात कधी ना कधी नक्कीच येतो. सहसा झोपताना हातावर शरीराचा भार पडल्यामुळे किंवा अयोग्य स्थितीत झोपल्यामुळे मज्जातंतूंवर काही काळ ताण येतो. त्यामुळे उद्‌भवणारा हा बधीरपणा काही मिनिटांतच सुटतो आणि हात पूर्ववत होतो. परंतु, हीच समस्या जर रोजची झाली असेल, वारंवार पुनरावृत्ती होत असेल किंवा सुन्नपणा बराच वेळ टिकून राहत असेल, तर या समस्येकडे साधेपणाने पाहून दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते.

सतत राहणार्‍या या सुन्नपणामागे ‘सर्व्हायकल रेडिक्युलोपॅथी’ ही वैद्यकीय स्थिती असण्याची शक्यता अधिक असते. या विकारामध्ये मानेच्या मणक्यामधून जाणार्‍या मज्जातंतूंच्या मूळ भागावर दाब येतो किंवा तिथे दाह निर्माण होतो. मानेतील गॅप किंवा चकती निसटणे, वयोमानानुसार मणक्यात होणारे बदल अथवा मज्जातंतूंच्या मार्गातील अरुंदपणा यांमुळे ही स्थिती निर्माण होते. मानेतील मज्जातंतू थेट खांदे, हात आणि हाताच्या बोटांपर्यंत विस्तारलेले असतात. त्यामुळे मानेमध्ये मज्जातंतू दाबले गेले की त्याची लक्षणे मानेपुरती मर्यादित न राहता थेट हाताच्या टोकापर्यंत पसरतात.

या आजारात मान आणि खांद्यामध्ये सुरू झालेली वेदना हातात तीव्रतेने पसरते. हाताच्या बोटांमध्ये सतत सुया टोचल्यासारख्या मुंग्या येणे, जळजळ होणे किंवा विजेचा तीव्र झटका बसल्यासारखी अचानक वेदना होणे ही याची प्राथमिक लक्षणे असतात. काही रुग्णांमध्ये हाताची पकड अत्यंत कमकुवत होते, ज्यामुळे साध्या वस्तू हातात धरताना किंवा उचलताना त्रास होतो. विशेष म्हणजे या विकारात प्रत्येक वेळी मानेत तीव्र वेदना असावीच असे मुळीच नाही. अनेकदा मानेत कोणतीही वेदना न होता केवळ हातात मुंग्या येणे, सुन्नपणा आणि अशक्तपणा हीच प्रमुख लक्षणे म्हणून समोर येतात.

आधुनिक जीवनशैलीत लॅपटॉपवर सतत काम करणे किंवा तासन्‌तास मोबाईल स्क्रीनकडे खाली मान घालून पाहणे यामुळे मानेच्या स्नायूंवर प्रचंड ताण येतो. परंतु, केवळ अयोग्य बसण्याच्या पद्धतीमुळेच हा बधीरपणा येतो असे समजून वैद्यकीय तपासणी न करणे चुकीचे ठरते. हातातील बधीरपणाकडे त्वरित लक्ष देणे का आवश्यक आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. जर हाताला अचानक सुन्नपणा आला असेल आणि त्यासोबतच चेहरा एका बाजूला झुकणे, बोलताना अडखळणे, मानसिक गोंधळ किंवा शरीराची एक पूर्ण बाजू कमकुवत होणे अशी लक्षणे दिसत असतील, तर हा स्ट्रोकचा म्हणजेच पक्षाघाताचा थेट इशारा असू शकतो.

बधीरपणासोबत छातीत प्रचंड दाब, श्वास घेताना त्रास होणे, अचानक खूप घाम येणे अथवा मळमळणे अशी लक्षणे आढळल्यास तो हृदयविकाराचा झटका असू शकतो. अशा वेळी अजिबात वेळ न दवडता तातडीने आपत्कालीन वैद्यकीय मदत घेतली पाहिजे. हाताचा सुन्नपणा सतत टिकून राहत असेल, वस्तू धरताना हात थरथरत असेल किंवा मानेला कोणतीही दुखापत झाल्यानंतर हा त्रास सुरू झाला असेल, तर मज्जारोगतज्ज्ञांकडून तपासणी करून घेणे गरजेचे आहे. बहुतांश प्रकरणांमध्ये ही समस्या केवळ औषधोपचार, योग्य फिजिओथेरपी आणि दैनंदिन सवयींमधील बदलांद्वारे शस्त्रक्रियेविना पूर्णपणे बरी होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT