4 हजार कोटींच्या राजवाड्यात राहणार्‍या ग्वाल्हेरच्या युवराजाची भाजी विक्री कंपनी 
विश्वसंचार

4 हजार कोटींच्या राजवाड्यात राहणार्‍या ग्वाल्हेरच्या युवराजाची भाजी विक्री कंपनी

पुढारी वृत्तसेवा

ग्वाल्हेर ः ‘युवराज’ आणि ‘सिंधिया’ हे नाव जोडले की, शाही वैभव, संपत्ती आणि ऐषोरामाची कल्पना सहज करता येते. ग्वाल्हेरच्या राजघराण्याची परंपरा खांद्यावर घेतलेले, 4000 कोटींच्या जय विलास पॅलेसमध्ये राहणारे आणि अब्जोंच्या संपत्तीचे मालक असलेले युवराज महाआर्यमन सिंधिया यांनी मात्र आपल्या पारंपरिक राजेशाही वारशाऐवजी वेगळ्या मार्गाची निवड केली आहे. शाही वैभवात रमण्याऐवजी त्यांनी आपल्या मेहनतीने वेगळी ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतला. महाआर्यमन यांनी भाजी विक्रीवर आधारित ‘My मंडी’ नावाचा स्टार्टअप सुरू केला. शाही खानदानाचा वारस असूनही त्यांनी फळे आणि भाजीपाला विक्रीचा व्यवसाय निवडला. या निर्णयामुळे अनेकांनी टीका केली. मात्र, त्यांनी ठाम राहून स्वतःच्या हिंमतीवर उद्योग उभारला.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे सुपुत्र असलेल्या महाआर्यमन यांनी प्राथमिक शिक्षण डून स्कूलमधून घेतले, त्यानंतर येल युनिव्हर्सिटीमधून पदवी पूर्ण केली. त्यांनी बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप आणि सॉफ्टबँकसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम केले. मात्र, नोकरीच्या स्थैर्यावर समाधान मानण्याऐवजी त्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा निर्णय घेतला. 2022 मध्ये त्यांनी आपल्या मित्रासोबत ‘My मंडी’ नावाने स्टार्टअप सुरू केले, जो ऑनलाईन कृषी एग्रिगेटर म्हणून कार्यरत आहे. हे स्टार्टअप थेट शेतकर्‍यांकडून ताजी फळे आणि भाज्या घेऊन ग्राहकांपर्यंत पोहोचवते. ‘My मंडी’ सध्या पाच शहरांमध्ये कार्यरत असून, हळूहळू त्याचा विस्तार होत आहे. सुरुवातीच्या काळात महाआर्यमन स्वतः सकाळी लवकर मंडईत जाऊन भाजीपाला खरेदी करत आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवत. ‘My मंडी’ने आतापर्यंत 3 फंडिंग राऊंड पूर्ण केले असून, 2023 मध्ये 1.2 दशलक्ष डॉलर्सचे (सुमारे 10 कोटी रुपये) गुंतवणूक मिळवली. कंपनीचे सध्याचे मूल्यांकन 150 कोटी रुपये असून, भविष्यात 80 कोटींची गुंतवणूक मिळवण्याचा त्यांचा मानस आहे. विशेष म्हणजे, स्व. रतन टाटा यांनीदेखील या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केलेली आहे.

महाआर्यमन यांचा जय विलास पॅलेस हा जगातील सर्वात आलिशान राजवाड्यांपैकी एक आहे. 1874 मध्ये बांधलेल्या या राजवाड्याची आजची किंमत अंदाजे 4000 कोटी रुपये आहे. तेथील दरबार हॉलच्या सजावटीसाठी 560 किलो सोने वापरण्यात आले आहे. तसेच, येथील 3500 किलो वजनाचा झुंबर जगातील सर्वात जड झुंबर मानला जातो, असा अतिशय श्रीमंत वारसा असूनही महाआर्यमन यांनी आपल्या हिंमतीवर व्यवसाय उभारण्याचा मार्ग निवडला. ग्वाल्हेरच्या जनतेशी त्यांचा नेहमीच संवाद असतो आणि ते आपल्या वडिलांप्रमाणे राजकारणातही सक्रिय आहेत. सोशल मीडियावर त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली असून, लोक त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठीही उत्सुक असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT