लंडन : पृथ्वीच्या अब्जावधी वर्षांच्या इतिहासाची साक्ष देणारे अवशेष आता लक्झरी मार्केटमधील लिलावाचे केंद्र बनू लागले आहेत. १४ जुलै २०२६ रोजी झालेल्या एका ऐतिहासिक लिलावात, 'टायरॅनोसॉरस रेक्स' (T. rex) प्रजातीचे अत्यंत दुर्मीळ आणि परिपूर्ण मानले जाणारे जीवाश्म तब्बल ५०.१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सना (सुमारे ४८१ कोटी रुपये) विकले गेले. 'गस' (Gus) असे नाव असलेले हे जीवाश्म सोदबीज (Sotheby's) या जगप्रसिद्ध लिलाव गृहात विकले गेले असून, जगातील आजवरचे सर्वात महागडे जीवाश्म ठरण्याचा नवा जागतिक विक्रम यामुळे प्रस्थापित झाला आहे. हे जीवाश्म खरेदी करणाऱ्या व्यक्तीची ओळख मात्र अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.
हे जीवाश्म २०२१ पासून पुढील तीन वर्षे व्यावसायिक संग्राहक थॉमस हेटकॅम्प आणि त्यांच्या पथकाने दक्षिण डकोटा येथील 'हेल क्रीक फॉर्मेशन'मधून अत्यंत मेहनतीने उत्खनन करून बाहेर काढले होते. हा लिलाव श्रीमंतांच्या जगासाठी एक विक्रम असला, तरी जीवाश्मशास्त्रज्ञांनी यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. 'सोसायटी ऑफ व्हर्टेब्रेट पॅलेऑन्टोलॉजी'चे भावी अध्यक्ष आणि ज्येष्ठ संशोधक यांच्या मते, 'गस'सारखे जीवाश्म ही घरात सजवून ठेवण्याची शोभेची वस्तू किंवा एखादी कलाकृती नाही, तर ते विज्ञानाचा कधीही भरून न निघणारा असा ऐतिहासिक दस्तावेज आहे. हे अवशेष पृथ्वीवरील जीवांची उत्क्रांती, त्यांचे नामशेष होणे, वाढ, रोग, दुखापती आणि प्राचीन परिसंस्थेचे पुरावे स्वतःमध्ये जतन करून ठेवतात. विज्ञान हे नेहमीच दाव्यांची स्वतंत्र पडताळणी आणि सखोल अभ्यासावर अवलंबून असते.
कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी संशोधकांना या अवशेषांचा पुन्हा-पुन्हा अभ्यास करावा लागतो, जुने निष्कर्ष तपासावे लागतात आणि नवे प्रश्न उपस्थित करावे लागतात. मात्र, एकदा का एखादे महत्त्वाचे जीवाश्म खासगी मालकीत गेले की, संशोधकांना त्याचा अभ्यास करण्यासाठी परवानगी मिळेलच याची शाश्वती राहत नाही. सामान्यतः खासगी संग्राहक हे अवशेष आपल्या घरात बंदिस्त करून ठेवतात. काही वेळा ते संग्रहालयांना अभ्यासासाठी दिले, तरी मालक कधीही आपला निर्णय बदलू शकतात आणि हे अवशेष परत घेऊ शकतात. टी. रेक्ससारख्या डायनासोरच्या बाबतीत ही समस्या अधिक गंभीर आहे.
२०२५ मधील एका अभ्यासानुसार, त्या काळात जगभरात केवळ ६१ टी. रेक्स जीवाश्म सार्वजनिक संस्था किंवा संग्रहालयांकडे सुरक्षित होते, तर तब्बल ७१ जीवाश्म खासगी लोकांच्या ताब्यात होते. याच कारणामुळे वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांचे जीवाश्म हे सार्वजनिक संस्था, विद्यापीठे किंवा सरकारी संग्रहालयांच्या ताब्यात असावेत, अशी आग्रही मागणी वैज्ञानिक संघटनांकडून केली जात आहे. जेणेकरून हे अमूल्य अवशेष कायमस्वरूपी सुरक्षित राहतील, संशोधकांसाठी उपलब्ध असतील आणि सामान्य जनतेलाही ते पाहता येतील.