उट्रेच (नेदरलँड) : अटलांटिक महासागरातील महत्त्वाचे प्रवाह हवामान बदलामुळे कधी कोलमडू शकतात, याचे अत्यंत महत्त्वाचे संकेत ‘गल्फ स्ट्रीम’ प्रवाहामध्ये दडलेले असल्याचे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे. हा बदल भविष्यातील मोठ्या नैसर्गिक संकटाची पूर्वसूचना ठरू शकतो.
मेक्सिकोच्या आखातातून उगम पावणारा आणि अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरून वाहणारा ‘गल्फ स्ट्रीम’ हा अटलांटिक मेरिडिओनल ओव्हरटर्निंग सर्क्युलेशन या महाकाय सागरी प्रवाह प्रणालीचा एक भाग आहे. ही प्रणाली उत्तर गोलार्धात आणि विशेषतः युरोपमध्ये उष्णता पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम करते. संशोधनानुसार, ही प्रणाली कमकुवत होत असून, ती एका अशा ‘टिपिंग पॉईंट’कडे (धोक्याची पातळी) वेगाने सरकत आहे, जिथे पोहोचल्यावर जगाच्या अनेक भागांतील हवामान पूर्णपणे बदलू शकते. यामुळे वायव्य युरोप आणि उष्णकटिबंधीय मान्सून क्षेत्रांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
ही प्रणाली नेमकी कधी कोलमडेल हे अद्याप अनिश्चित असले, तरी गल्फ स्ट्रीममध्ये दडलेले ‘अर्ली वॉर्निंग सिग्नल’ (पूर्वसूचना) शास्त्रज्ञांना ही घटना घडण्यापूर्वी अनेक वर्षे आधी अंदाज लावण्यास मदत करू शकतात. उट्रेच विद्यापीठातील हवामान भौतिकशास्त्राचे संशोधक आणि या अभ्यासाचे मुख्य लेखक रेने व्हॅन वेनस्टेन यांनी सांगितले की, ‘सुरुवातीला गल्फ स्ट्रीमचा प्रवाह हळूहळू उत्तरेकडे सरकतो, जो ही प्रणाली कमकुवत होण्याशी संबंधित आहे. परंतु, जेव्हा ती अतिशय कमकुवत होते, तेव्हा या प्रवाहात एक मोठी उडी दिसून येते, जो एक महत्त्वाचा धोक्याचा इशारा आहे.’
या प्रणालीमधील इतर प्रवाहांच्या तुलनेत ‘गल्फ स्ट्रीम’ हा वार्याद्वारे चालवला जाणारा प्रवाह आहे. हा प्रवाह फ्लोरिडाहून अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीने उत्तर कॅरोलिनापर्यंत जातो आणि नंतर अटलांटिक महासागराच्या दिशेने वळतो. जरी हा पृष्ठभागावरील प्रवाह असला, तरी त्याचे स्थान खोल समुद्रातील प्रवाहांवर अवलंबून असते. जेव्हा ही प्रणाली कमकुवत होते, तेव्हा खोल समुद्रातील प्रवाहांची पकड सैल होते आणि परिणामी गल्फ स्ट्रीम उत्तर दिशेला सरकू लागतो.