तैपेई : दातात किंवा दाढेत वेदना होणे ही अत्यंत सामान्य बाब आहे. निरनिराळ्या कारणांमुळे दाढेत सूज येऊन तीव्र वेदना सुरू होतात. मात्र, तैवानमध्ये अक्कलदाढ दुखीचे एक अत्यंत विचित्र प्रकरण समोर आले होते, जे पाहून खुद्द दंतचिकित्सकही (डेंटिस्ट) अवाक् झाले. अशी घटना यापूर्वी कधीही पाहण्यात किंवा ऐकण्यात आली नव्हती. तेथील एक तरुण प्रचंड दाढदुखीमुळे डेंटिस्टकडे गेला होता. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्याच्या वरच्या अक्कलदाढेत समस्या असल्याचे आणि ती काढून टाकावी लागेल असे सांगितले. मात्र, जेव्हा डॉक्टर ती अक्कलदाढ काढत होते, तेव्हा समोर आलेले दृश्य पाहून त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. त्या तरुणाच्या अक्कलदाढेतून चक्क पेरूचे एक बीज अंकुरलेले दिसत होते!
संबंधित तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, त्याने त्याच महिन्याच्या सुरुवातीला पेरू खाल्ला होता. हा तरुण तोंडाच्या स्वच्छतेकडे अजिबात लक्ष देत नसे. त्याच्या ज्या वरच्या अक्कलदाढेत वेदना होत होत्या, ती दाढ किडली होती आणि तिला मोठे छिद्र पडले होते. पेरू खाताना त्याचे एक बी या छिद्रात जाऊन अडकले. विशेष म्हणजे, या वरच्या दाढेच्या अगदी खाली असलेली अक्कलदाढ आधीपासूनच नव्हती. त्यामुळे त्या बीजाला रुजण्यासाठी आणि रोपाला वाढण्यासाठी पुरेशी जागा आणि अनुकूल वातावरण मिळाले. अवघ्या १० दिवसांत पेरूचे बी अंकुरून त्याचे चिमुकले रोप तयार झाले होते.
हे दुर्मीळ आणि आश्चर्यकारक प्रकरण २०१३ मध्ये ‘ब्रिटिश डेंटल जर्नल’मध्ये प्रकाशित करण्यात आले होते. यावरून सहज लक्षात येऊ शकते की, तोंडाची स्वच्छता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक संशोधनांनुसार, तुमचे चयापचय आणि पचनसंस्था निरोगी राहण्यासाठी तोंडाची स्वच्छता राखणे खूप गरजेचे आहे. परंतु, जर तुम्ही ओरल हायजीन (तोंडाची स्वच्छता) पाळली नाही, तर तुम्हाला सर्वात आधी कॅव्हिटी (दंतक्षय/कीड) आणि टार्टर (दात पिवळे पडणे किंवा क्षारांचा थर साचणे) या समस्यांना सामोरे जावे लागू शकते; जे तुमच्या दातांसाठी आणि हिरड्यांसाठी अत्यंत हानिकारक आहे. त्यामधून इतरही अनेक समस्या उद्भवतात.