Guava benefits 
विश्वसंचार

Guava benefits : लोह शोषून घेण्यासाठी पेरू ठरतो फायदेशीर!

नवी दिल्लीतील आहारतज्ज्ञांचा खुलासा

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : अनेकांचा असा समज असतो की, पेरू खाल्ल्याने शरीराला थेट मोठ्या प्रमाणात लोह मिळते. मात्र, आहारतज्ज्ञांच्या मते, पेरूमध्ये लोहाच्या तुलनेत 'व्हिटॅमिन सी' खूप जास्त प्रमाणात असते. हे पोषक तत्त्व शाकाहारी अन्नातून मिळणारे 'नॉन-हीम आयर्न' (Non-Heme Iron) शोषून घेण्याची शरीराची क्षमता वाढवते. पालक, डाळी, बीन्स आणि टोफू यांसारख्या वनस्पतींपासून मिळणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये हे लोह आढळते. व्हिटॅमिन सी या लोहाचे अशा रूपात रूपांतर करते, जे शरीर सहजपणे शोषून घेऊ शकते.

आहारतज्ज्ञ सांगतात, जर तुम्ही डाळी किंवा हिरव्या पालेभाज्यांसारखे लोहयुक्त शाकाहारी अन्न खात असाल, तर जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेच एक पूर्ण पेरू खाल्ल्यास शरीरात लोह शोषून घेण्याची प्रक्रिया अधिक चांगली होऊ शकते. पेरूचा ज्यूस पिण्यापेक्षा पूर्ण पेरू खाणे हा आरोग्यासाठी अधिक चांगला पर्याय आहे. पेरू खाल्ल्याने शरीराला 'डायटरी फायबर' मिळते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते, पोट भरल्यासारखे वाटते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. याशिवाय पेरू हा अँटिऑक्सिडंटस्‌ आणि पोटॅशियमचाही उत्तम स्रोत आहे. जर एखाद्या महिलेला 'आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया' (लोहाच्या कमतरतेमुळे होणारी रक्ताल्पता) असल्याचे निदान झाले असेल, तर केवळ पेरूचा ज्यूस पिऊन किंवा पेरू खाऊन लोहाची कमतरता भरून निघणार नाही. अशा वेळी डॉक्टरांनी दिलेल्या लोहाच्या गोळ्या आणि संतुलित आहार हाच उपचाराचा मुख्य भाग असतो. मात्र, लोहयुक्त अन्न किंवा लोहाच्या गोळ्यांसोबत पेरू खाल्ल्यास त्यातील व्हिटॅमिन सी मुळे लोह शरीरात वेगाने शोषले जाते. आहाराशी संबंधित एक महत्त्वाचा सल्ला असा की, जेवणासोबत किंवा लोहाच्या गोळ्या घेतल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिऊ नये. ही पेये शरीरात लोह शोषून घेण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणतात आणि लोहाचे प्रमाण कमी करतात. त्यामुळे जेवण आणि चहा-कॉफीमध्ये किमान १ ते २ तासांचे अंतर ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून खाल्लेल्या अन्नपदार्थांचा शरीराला पूर्ण फायदा मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT