न्यूयॉर्क : एलॉन मस्क यांची कंपनी ‘एक्सएआय’ने (xAI) आपला सर्वात प्रगत एआय चॅटबॉट ‘ग्रोक-4’ (Grok-4) लाँच केला आहे. यानंतर मस्क यांनी दावा केला आहे की, हा चॅटबॉट प्रत्येक क्षेत्रात पीएच.डी. स्तराची समज ठेवतो. मस्क यांच्या मते, हा एआय केवळ गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरेच देऊ शकत नाही, तर 2025 च्या अखेरपर्यंत नवीन तंत्रज्ञान आणि 2 वर्षांत नवीन भौतिकशास्त्राचा शोधही लावू शकतो. ‘जर ग्रोक-4 ने कर्करोगावरील औषध डिझाईन केले आणि ते क्लिनिकल ट्रायल्समध्ये यशस्वी ठरले, तर एआय ‘रिअॅलिटी टेस्ट’ पास झाला असे मानले जाईल,’ असेही ते म्हणाले.
मात्र, या लाँचपूर्वी ग्रोकच्या काही आक्षेपार्ह पोस्ट्समुळे मोठा वाद निर्माण झाला होता. यामध्ये ज्यू-विरोधी टीका आणि हिटलरच्या कौतुकाचा समावेश होता. ग्रोक-4 हे मस्क यांच्या कंपनीने विकसित केलेले नवीनतम एआय मॉडेल आहे. ओपन एआयचे चॅटजीपीटी आणि गूगलच्या जेमिनी यांसारख्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म्सशी स्पर्धा करण्यासाठी हे तयार करण्यात आले आहे.
याला एक्सएआयच्या विशाल ‘कोलोसस’ सुपरकॉम्प्युटरवर प्रशिक्षित (ट्रेंड) करण्यात आले आहे, ज्यामध्ये 2 लाख जीपीयू (GPU) वापरण्यात आले आहेत. मस्क यांचा दावा आहे की, ग्रोक-4 गणित आणि विज्ञानासारख्या चाचण्यांमध्ये 25.4% गुण मिळवतो आणि टूल्सच्या मदतीने हा स्कोर 44.4% पर्यंत पोहोचतो. हा स्कोर जेमिनी 2.5 प्रो (Gemini 2.5 Pro) सारख्या इतर एआय चॅटबॉटस्पेक्षा चांगला आहे. मस्क यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात लिहिले होते की, ‘तुम्ही तुमची संपूर्ण सोर्स कोड फाईल grok. com वरील क्वेरी एंट्री बॉक्समध्ये कट-पेस्ट करू शकता आणि ग्रोक-4 ती तुमच्यासाठी दुरुस्त करेल!
xAI मध्ये प्रत्येकजण हेच करतो. हे कर्सरपेक्षा चांगले काम करते.’ त्यांनी हे मान्य केले आहे की, एआयकडून कधी कधी सामान्य ज्ञानाच्या (कॉमन सेन्स) बाबतीत चुका होऊ शकतात. परंतु, शैक्षणिक विषयांवरील त्याची समज अतुलनीय आहे. मस्क यांनी असेही म्हटले आहे की, हा एआय लवकरच रॉकेट किंवा कर्करोगावरील औषध यांसारखे नवीन तंत्रज्ञान डिझाईन करू शकेल. तथापि, त्यांनी हे मान्य केले की, त्याच्यामध्ये कधी कधी कॉमन सेन्सची कमतरता असू शकते आणि सध्या तो इमेज प्रोसेसिंगमध्ये कमकुवत आहे.