लंडन : हवामान बदलामुळे पृथ्वीसमोर असलेल्या संकटाचे गांभीर्य स्पष्ट करणारा एक नवा संशोधन अहवाल समोर आला आहे. सुमारे 7,000 वर्षांपूर्वी ग्रीनलँडमधील बर्फाच्या चादरीचा एक मोठा भाग पूर्णपणे वितळला होता, असा खळबळजनक खुलासा शास्त्रज्ञांनी केला आहे. विशेष म्हणजे, त्या काळी असलेले तापमान हे या शतकाच्या अखेरीस होणार्या अंदाजित तापमानाइतकेच होते. यामुळे भविष्यात समुद्रपातळीत मोठी वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.
उत्तर-पश्चिम ग्रीनलँडमध्ये सध्या 1,640 फूट (500 मीटर) जाडीचा आणि 965 चौरस मैल (2,500 चौरस किमी) क्षेत्रावर पसरलेला ‘प्रूडो डोम’ नावाचा बर्फाचा डोंगर आहे. ‘होलोसीन’ कालखंडाच्या सुरुवातीला जेव्हा तापमान वाढले होते, तेव्हा हा प्रचंड बर्फाचा साठा पूर्णपणे वितळला होता आणि त्याखाली असलेली जमीन उघडी पडली होती. ग्रीनलँडमधील बर्फाची चादर सध्या जगभरातील समुद्रपातळी वाढण्यास कारणीभूत असलेला सर्वात मोठा घटक आहे.
शास्त्रज्ञांनी असा इशारा दिला आहे की, जर ग्रीनलँडमधील सर्व बर्फ वितळला, तर जागतिक समुद्रपातळी सरासरी 24 फूट (7.3 मीटर) पर्यंत वाढू शकते. युनिव्हर्सिटी ऑफ केंटकी येथील भूगर्भशास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे मुख्य लेखक कॅलेब वॉलकोट-जॉर्ज म्हणाले, जेव्हा तुमच्या आजूबाजूला सर्व दिशांना फक्त बर्फच दिसतो, तेव्हा तो बर्फ भूतकाळात पूर्णपणे नाहीसा झाला होता आणि भविष्यातही तसे होऊ शकते, हा विचारच थक्क करणारा आहे.
सुमारे 11,700 वर्षांपूर्वी शेवटचे हिमयुग संपल्यानंतर ग्रीनलँडचे तापमान सध्याच्या सरासरीपेक्षा जास्त वाढले होते. मात्र, त्या काळात बर्फाचे प्रमाण नक्की किती होते, हे शोधणे कठीण असते. याचे मुख्य कारण म्हणजे त्या काळातील पुरावे आज अस्तित्वात असलेल्या जाड बर्फाच्या थराखाली गाडले गेले आहेत. या नवीन संशोधनामुळे हवामान बदलाच्या परिणामांचा अंदाज लावणे आता सोपे होणार असून, समुद्रकिनार्यालगतच्या शहरांसाठी हा धोक्याचा इशारा मानला जात आहे.