वॉशिंग्टन : भारतीय स्वयंपाकघरात हिरवी मिरची नसणे म्हणजे जेवणाची रंगतच उडणे. वरण, भाजी, पराठा असो वा चटणी...हिरवी मिरची हवीच! अनेकदा तर भाजी खरेदी केल्यावर आपण दुकानदाराला हसत हसत म्हणतो, ‘भाऊ, थोडी कोथिंबीर-मिरची पण टाका ना!’ आणि विक्रेताही कसलेही पैसे न घेता ४-५ मिरच्या पिशवीत टाकून देतो; पण अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय महिलेने तिथल्या हिरव्या मिरचीचे दर दाखवणारा व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहून नेटकरी पार चक्रावून गेले आहेत.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये ती महिला सांगते की, अमेरिकेत हिरवी मिरची खरेदी करणे म्हणजे एखादी महागडी वस्तू खरेदी करण्यासारखे आहे. ती कॅमेऱ्यासमोर मिरचीचे एक छोटे पाकीट दाखवते, ज्याचे वजन सुमारे ११४ ग्रॅम आहे. तिच्या मते, या पाकिटात फक्त १२ ते १३ मिरच्या आहेत आणि त्याची किंमत भारतीय रुपयांनुसार सुमारे ४०० रुपये आहे. महिलेच्या दाव्यानुसार, या हिशोबाने जर १ किलो हिरव्या मिरचीचा भाव काढला, तर तो तब्बल ३,५०० रुपयांपर्यंत पोहोचतो! हा प्रकार सांगताना ती गमतीने म्हणाली, ‘भारतात तर भाजीवाला एवढी मिरची मोफतच देऊन टाकतो.’ हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, हजारो लोकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत: एका यूजरने लिहिले, ‘भारतात २० ते ३० रुपयांत भरपूर हिरवी मिरची मिळते.’ दुसऱ्या एका यूजरने मिश्कीलपणे कमेंट केली, ‘३,५०० रुपयांत तर भारतात संपूर्ण आठवड्याची भाजी आणि पिशवी भरून जाईल!’ काही लोकांनी तर महिलेला विनोदी सल्ला देत म्हटले की, ‘पुढच्या वेळी भारतातून अमेरिकेला जाताना सोबत मिरच्यांचे पार्सल घेऊनच जा!’