Deep Maniot Greeks | ग्रीसमधील ‘या’ समुदायाचे नाते थेट कांस्य युगाशी! 
विश्वसंचार

Greek ancient community | ग्रीसमधील ‘या’ समुदायाचे नाते थेट कांस्य युगाशी!

पुढारी वृत्तसेवा

अथेन्स : दक्षिण ग्रीसच्या पेलोपोनेशियन द्वीपकल्पाच्या दुर्गम भागात राहणारा एक गट गेल्या 1000 वर्षांहून अधिक काळ जनुकीयद़ृष्ट्या जगापासून वेगळा राहिला आहे. एका नवीन डीएनए संशोधनातून असे समोर आले आहे की, या समुदायाची मुळे थेट ‘कांस्य युगा’पर्यंत जाऊन पोहोचतात.

या गटाला ‘डीप मॅनिओट ग्रीक्स’ म्हणून ओळखले जाते. संशोधनानुसार, हे लोक प्राचीन ग्रीक आणि बायझँटाईन काळातील रोमन लोकांचे वंशज आहेत. दीर्घकाळ राहिलेला भौगोलिक एकांतवास आणि कडक पितृसत्ताक कुटुंब पद्धतीमुळे या समुदायाचे जनुकीय वेगळेपण गेल्या 1,400 वर्षांपासून टिकून राहिले आहे. मॅनी द्वीपकल्प हा प्राचीन काळी ‘लॅकोनिया’ प्रांताचा भाग होता, जिथे ख्रिस्तपूर्व सातव्या शतकात स्पार्टा या बलाढ्य नगरराज्याचे वर्चस्व होते. इसवी सन सहाव्या शतकात जेव्हा स्लाव्हिक लोकांनी ग्रीसवर आक्रमण केले, तेव्हा संपूर्ण ग्रीसमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या बदलली. मात्र, मॅनी द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात राहणारे हे लोक या आक्रमणांपासून वाचले. ते उर्वरित ग्रीसपासून भौगोलिक आणि सांस्कृतिकद़ृष्ट्या पूर्णपणे वेगळे पडले. ‘कम्युनिकेशन्स बायोलॉजी’ या नियतकालिकात 4 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात, 100 हून अधिक मॅनिओट लोकांच्या डीएनएची तपासणी करण्यात आली.

त्यातून पुढील गोष्टी समोर आल्या : 1. जेनेटिक आयलंड : हा समुदाय एक प्रकारचे ‘जनुकीय बेट’ आहे, ज्यांच्यावर बाहेरील स्थलांतराचा कोणताही परिणाम झाला नाही. 2. मध्ययुगापूर्वीचा आरसा : अभ्यासाचे मुख्य लेखक लिओनिडास-रोमानोस डॅव्ह्रानोग्लू (ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी) यांच्या मते, ‘हे लोक मध्ययुगातील मोठ्या उलथापालथीच्या आधीचा दक्षिण ग्रीसचा जनुकीय नकाशा आजही जतन करून आहेत.’ 3. स्थलांतराचा प्रभाव नाही : युरोपमधील ‘बार्बेरियन आक्रमणे’ किंवा स्थलांतराच्या काळात (इ.स. 300 ते 700) जर्मनिक टोळ्या, हूण आणि स्लाव्हिक लोक देशभर पसरले; पण या समुदायाची जनुकीय शुद्धता अबाधित राहिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT