बीजिंग : सध्या जगभरात दुर्मीळ खनिजांवर ताबा मिळवण्याची स्पर्धा सुरू आहे. चीनने जगातील बहुतांश दुर्मीळ खनिजांवर नियंत्रण मिळवले असताना, अमेरिका, जपान आणि भारतासारखे देश त्याला सतत आव्हान देत आहेत. जगाची वाटचाल आता स्वच्छ ऊर्जेकडे होत असल्यामुळे, लिथियम आयन बॅटरीवर चालणार्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी प्रचंड वाढत आहे. लिथियमच्या बाबतीत चीन जगभरातील देशांना आव्हान देत आहे आणि बॅटरी उद्योगात चिनी कंपन्यांचे वर्चस्व वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, ग्रॅफाईट हे आता लिथियम बॅटरी उद्योगाचा ‘कणा’ बनलेले नवे महत्त्वपूर्ण खनिज ठरले आहे. ग्रॅफाईटच्या साठ्याबद्दल बोलायचे झाल्यास, जगातील सर्वात मोठा साठा चीनकडे आहे; पण भारताची भूमीसुद्धा या खजिन्याने समृद्ध आहे.
विज्ञान पत्रिका ‘नेचर’ च्या ताज्या अहवालानुसार, ग्रॅफाईट लिथियम आयन बॅटरीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ते आता एक नवीन ‘महत्त्वपूर्ण खनिज’ बनले आहे. यामुळेच स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करणार्या जगासाठी हे एक अत्यंत महत्त्वाचे खनिज बनले आहे. नैसर्गिक ग्रॅफाईटचा पुरवठा जगातील काही विशिष्ट भागांवरच केंद्रित आहे आणि त्याचे उत्पादन वाढवणेही कठीण आहे, ज्यामुळे पुरवठ्यात अडथळे येत आहेत. यामुळे जगभरात कृत्रिम ग्रॅफाईटचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो.
कृत्रिम ग्रॅफाईट अधिक शुद्ध असते आणि त्याची कार्यक्षमताही चांगली असते. मात्र, कृत्रिम ग्रॅफाईट तयार करण्यासाठी जीवाश्म इंधनातून मिळणारी खूप ऊर्जा खर्च होते, जे पर्यावरणासाठी योग्य नाही. ग्रॅफाईटचे भविष्य आता दोन बदलांवर अवलंबून आहे :
‘ग्रीन’ उत्पादन : नूतनीकरणीय कार्बन स्रोतांचा वापर करून ग्रॅफाईटचे ’ग्रीन’ (पर्यावरणपूरक) उत्पादन करणे.
पुनर्वापर : जुन्या बॅटर्यांमधून ग्रॅफाईटचा पुनर्वापर करणे. ग्रॅफाईटचा उपयोग लिथियम आयन बॅटरीमध्ये अॅनोड म्हणून केला जातो. अॅनोड हा बॅटरीचा तो भाग आहे, जो चार्जिंग आणि डिस्चार्जिंग दरम्यान आयनांना साठवून ठेवतो. स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने जगाच्या वाटचालीसाठी ग्रॅफाईट अत्यंत आवश्यक आहे. भारतदेखील या खनिजाने समृद्ध आहे आणि जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे, जिथे मोठा साठा उपलब्ध आहे.