Old telephone AI assistant | आजोबांचा 1970 चा जुना फोन बनला ‘स्मार्ट एआय असिस्टंट’ 
विश्वसंचार

Old telephone AI assistant | आजोबांचा 1970 चा जुना फोन बनला ‘स्मार्ट एआय असिस्टंट’

बंगळूरच्या तरुणाचा अवघ्या 2,307 रुपयांत भन्नाट प्रयोग

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : तंत्रज्ञान आणि जुन्या वस्तूंचा अनोखा संगम सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. बंगळूर येथील पंकज नावाच्या एका तरुणाने आपल्या आजोबांच्या काळातील 1970 च्या दशकातील ‘रोटरी डायल’ फोनचे रूपांतर एका आधुनिक एआय असिस्टंटमध्ये केले आहे. बाहेरून विंटेज दिसणार्‍या या फोनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान दडलेले असून त्याचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

पंकज यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर या प्रयोगामागची भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या मते, सध्याचे आधुनिक स्मार्ट स्पीकर्स केवळ प्लास्टिकच्या साध्या डब्यासारखे दिसतात, जे त्यांना फारसे आवडत नाहीत. म्हणूनच त्यांनी एखाद्या जुन्या वस्तूलाच ‘स्मार्ट’ बनवण्याचा निर्णय घेतला आणि आजोबांच्या जुन्या रोटरी फोनवर काम सुरू केले. या विशेष फोनचा वापर करणे अत्यंत सोपे आहे. जेव्हा वापरकर्ता फोनचा रिसिव्हर उचलतो, तेव्हा त्यातील सिस्टीम कार्यान्वित होते. ‘Hey Kiri’ (हे किरी) असे म्हणताच हा एआय असिस्टंट सक्रिय होतो.

या उपकरणाद्वारे पुढील कामे सहज करता येतात : कॅब बुक करणे आणि मीटिंग शेड्यूलिंग, खाद्यपदार्थ ऑर्डर करणे, घरातील दिवे बंद करणे, ई-मेलचा सारांश जाणून घेणे. या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची किंमत. पंकज यांनी हा संपूर्ण सेटअप केवळ 2,307 रुपयांत तयार केला आहे. इतक्या कमी खर्चात जुन्या फोनचे एआय असिस्टंटमध्ये झालेले रूपांतर पाहून तंत्रज्ञान प्रेमी थक्क झाले आहेत. हा फोन पंकज यांच्या डेस्कवर एका शोभेच्या वस्तूचा लूक देतो आणि गरजेच्या वेळी स्मार्ट उपकरणाप्रमाणे काम करतो. सोशल मीडियावर या प्रयोगाचे प्रचंड कौतुक होत आहे. जुन्या हार्डवेअरचा वापर करून नवीन काहीतरी शिकणे आणि बनवणे ही एक कला असल्याचे नेटीझन्सनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT