बठिंडा : पंजाबमधील बठिंडा जिल्ह्यातील बहादूरगड जंडियान गावातील वृद्ध शेतकरी महिंदर कौर यांना अखेर नव्या घराचा दिलासा मिळाला आहे. भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केलेल्या महिंदर कौर यांच्या कुटुंबासाठी नव्या घराचे हस्तांतरण होणार आहे.
महिंदर कौर यांच्या जुन्या घराची अवस्था अत्यंत जीर्ण झाली होती. जवळपास 50 वर्षे जुने असलेले ते घर राहण्यायोग्य राहिले नव्हते. या परिस्थितीची माहिती माध्यमांतून समोर आल्यानंतर यूकेस्थित समाजसेवक रणधीर सिंह यांच्या नेतृत्वाखालील मिडलँड लंगर सेवा सोसायटी या संस्थेने मदतीचा हात पुढे केला.
संस्थेने जुन्या घराच्या जागेवर दोन खोल्या आणि स्वयंपाकघर असलेले नवे घर उभारले आहे. हे बांधकाम सुमारे तीन महिन्यांत पूर्ण करण्यात आले. संस्थेचे सदस्य हरविंदर सिंह यांनी सांगितले की, गरजू कुटुंबांसाठी आतापर्यंत सुमारे 32 घरे उभारण्यात आली आहेत. महिंदर कौर यांची परिस्थिती आणि त्यांच्या मुलाच्या हालचालींवरील मर्यादा लक्षात घेऊन हे घर प्राधान्याने बांधण्यात आले. संस्थेकडून घरासोबतच पंखे, दिवे आणि वॉशिंग मशिनसारखी मूलभूत उपकरणेही कुटुंबाला देण्यात येणार आहेत. त्यामुळे कौर कुटुंबाच्या दैनंदिन जीवनात काहीसा दिलासा मिळणार आहे.