विश्वसंचार

लोकांच्या भुकेसाठी दोन रुपयांना इडली विकणारी आजी!

Arun Patil

चेन्नई : अत्यंत गरिबीतही भुकेल्या लोकांना दोन घास भरवणारे अनेक लोक आपल्या या पवित्र भारतभूमीत आहेत. नर्मदा परिक्रमा करणार्‍या लोकांना खाऊ घालणारे काठावरचे आदिवासी असोत किंवा हिमालयातील साधुसंतांना दोन वेळेचे अन्न देणारे पहाडी गरीब लोक असोत, देशात सर्वत्र अशी सहृदयता पाहायला मिळते. तामिळनाडूतील पुदुक्कोट्टई येथे तुम्ही धनम पाटीच्या (आजीच्या) घरी भेट दिली तर तुम्हाला वाफाळत्या इडली, चटणी आणि सांबारवर ताव मारणारे सर्व वयोगटातील लोक दिसतील. येथे येणार्‍या ग्राहकांसाठी खुर्च्या, टेबल्स आणि प्रवेशद्वार या सुविधा नसल्या तरीही या 84 वर्षे वयाच्या आजीचे प्रेम मात्र भरभरून आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की गेल्या अनेक वर्षांपासून इडली विक्रीचा व्यवयास करणारी आजी फक्त 2 रुपयांना इडली विकते आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत आजी केवळ एक रुपयाला एक इडली देत होत्या!

दोन मुले आणि आजारी पतीसह राहत असताना कठीण आर्थिक परिस्थितीमुळे धनम पाटीने इडली विकण्याचा व्यवसाय सुरू केला. जेवणाची किंमत आर्थिकद़ृष्ट्या परवडणारी असली पाहिजे, असे धनम पाटीचे ठाम मत आहे. त्यामुळेच तिने जेव्हा या व्यवसायाची सुरुवात केली तेव्हा फक्त 3 पैशांना ती इडली विकत होती. मुलांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तिने इडलीच्या किमतीमध्ये हळूहूळू वाढ केली. अगदी चार वर्षांपूर्वीपर्यंत धनम पाटी 1 रुपयाला इडली विकत होती.आता ती फक्त 2 रुपयांना इडली विकते. तीन वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर तिने इडलीच्या किमती वाढवल्या.

इडलीची किंमत आणखी का वाढवली नाही असे विचारले असता ती उत्तर देते, "लोकांना 10 रुपयांत पोटभर जेवण मिळायला हवे." तरीसुद्धा, इतरांना मदत करण्याच्या प्रयत्नात, 84 वर्षीय वृद्धा तिच्या स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करते. असंख्य चहाच्या कपांची विक्री करून आणि उदार लोकांच्या मदतीमुळे ती जगते आहे. हे लोक तिला तांदूळ, मसूर आणि कधीकधी रोख रक्कम देतात. तिला फक्त पक्के किंवा कायमस्वरूपी घर हवे आहे, कारण ती सध्या ज्या घरात राहत आहे ते जीर्ण झाले आहे आणि ते कोणत्याही क्षणी कोसळू शकते. रेशनचे धान्य आणि कडधान्ये वापरून धनम पाटी इडलीचे पीठ आणि सांभर तयार करते. तिला मिळणार्‍या रेशनच्या वस्तू तिने उत्पादन केलेल्या प्रमाणासाठी अपुरे पडते; मात्र विश्वासू ग्राहक आणि हितचिंतक तिला त्यांच्या रेशनच्या तांदळ देऊन मदत करतात.

SCROLL FOR NEXT