वॉशिंग्टन : ओपन एआयने त्याच्या आतापर्यंतच्या सर्वात अत्याधुनिक, सर्वात स्मार्ट एआय मॉडेल, जीपीटी-4.5 ची घोषणा केली असून या नव्या एआय मॉडेलमुळे एआय क्षेत्रात नव्या क्रांतीचे संकेत आहेत. सध्या हे मॉडेल जगभरातील चॅट जीपीटी युजर्ससाठी आणि डेव्हलपरसाठी उपलब्ध होईल. जीपीटी-4.5 पुढील आठवड्यात प्लस आणि टीम्स युजर्ससाठी रोलआउट होईल आणि त्यानंतर दुसर्या आठवड्यात एंटरप्राईज आणि एज्यू युजर्ससाठी रोलआऊट होईल, असे ओपन एआयने याप्रसंगी जाहीर केले. व्यापक ज्ञान, जगभराची उत्तम समज, विविध विषयांबाबत उत्तम विश्वासार्हता, हे या नव्या मॉडेलचे खास वैशिष्ट्य असेल, असे यावेळी सांगण्यात आले आहे.
चॅट जीपीटी-4.5 च्या प्रारंभिक चाचण्यांमधून असे आढळून आले आहे की, या नव्या मॉडेलमध्ये अनेक आमुलाग्र सुधारणा घडवून आणण्यात आल्या आहेत. जगभराची असलेली उत्तम समज यामुळे याचा वापर अधिक कौशल्याने केला जाऊ शकतो, असेही निरीक्षण यात नोंदवले गेले आहे. जीपीटी-4.5 सह संवाद साधताना ते अधिक सोयीचे वाटते. त्याचे व्यापक ज्ञान लेखन, प्रोग्रॅमिंग व प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी विशेष उपयुक्त ठरू शकते, असाही ओपन एआयचा दावा आहे. चॅट जीपीटी-4.5 नवे पॅटर्न्स ओळखू शकते, त्यांच्यात कनेक्शन्स ड्रॉ करू शकते. शिवाय क्रिएटिव्ह इनसाईटस जनरेट करू शकते, याचा यात पुढे उल्लेख करण्यात आला आहे.
कंपनीने सांगितले की, या एआय मॉडेलला ‘नवीन देखरेख तंत्रज्ञानांसह प्रशिक्षण दिले गेले आहे जे पारंपरिक देखरेख केलेल्या जीपीटी-4.0 मध्ये वापरण्यात आलेल्या फाइन-ट्यूनिंग आणि मानवी फीडबॅकवरून रिवॉर्ड-आधारित शिक्षण पद्धतींसोबत संकलित केले आहे. ओपन एआयचे सीईओ सॅम अल्टमन यांनी याला ‘एक विशाल आणि अत्याधुनिक मॉडेल’ असे संबोधले आणि ते ‘बेंचमार्क्स क्रश करणार नाही’, अशी ग्वाही देखील दिली. त्यांनी असेही म्हटले की कंपनीला प्लस आणि प्रो स्तरांवर एकाच वेळी रोलआऊट करण्यासाठी जीपीयू कमी पडल्या. ‘आम्ही पुढील आठवड्यात दह हजार जीपीयू जोडणार आहोत आणि त्यानंतर प्लस स्तरावर ते रोलआउट करू. हे आम्हाला अशाप्रकारे ऑपरेट करायचे नव्हते, पण वाढीच्या अचानक लहरीचा अंदाज घेणे कठीण आहे ज्यामुळे जीपीयूचा तुटवडा निर्माण होतो,’ असे अल्टमन यांनी एक्स या सोशल प्लॅटफॉर्मवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.